नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नक्षली, ग्रामीण आणि जीवन स्पर्शी आयपीएस एक समृद्ध कादंबरी।। कादंबरी हा प्रकार मराठी साहित्यामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेला आहे मात्र सध्या आधुनिक गतिमान जीवनामुळे, तसेच व्यासंगाचा अभाव असल्यामुळे नवीन कादंबरी थोड्या अभावानेच येत आहे, आली तरी अनेक वेळा ती कादंबरी जुन्या एखाद्या कथानकावर, किंवा प्रसंगी चित्रपटावर आधारित असते. बऱ्याच वेळा तर कादंबरी वाचतांना लेखकाला काय सांगायचे आहे तेच कळत नाही त्यामुळे कादंबरी वाचकांना रुचत नाही अशा परिस्थितीमध्ये एखादी दर्जेदार आणि स्वतंत्र विषय आणि आशयाची एखादी कादंबरी मिळाली तर साहित्य समृद्धीची जाणीव नव्याने सजीव होते. असा अनुभव रमेश निनाजी सरकटे यांच्या आयपीएस कादंबरीमुळे वाचकाला आल्याशिवाय राहत नाही. कादंबरी लेखनामध्ये असलेली गती आणि प्रगती, प्रचंड आशयघनता, सुस्पष्ट आणि वास्तव कथावस्तू, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या गर्दीमधून पात्रांची निवड तसेच डोळ्यांनी जे दिसते ते वास्तव कितीही भीषण असले तरी ते शब्दांकित करणे अशा सर्व सुंदर जूळून आलेल्या यशस्वी समीकरण साधत स्वतः रेल्वे पोलीस मध्ये पोलीस अधीक्षक ह्या उच्च पदावर सेवानिवृत्त झालेल्या मित्रवर्य रमेश निनाजी सरकटे यांच्या आयपीएस या कादंबरीचा जन्म झाला असे ही कादंबरी वाचल्यावर जाणवते. खरे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात समृद्ध कादंबरी विश्वाची ओळख बारोमास ह्या साहित्य अकादमी प्राप्त सदानंद देशमुख यांच्या कादंबरी सोबतच निशाणी डावा अंगठा या रमेश इंगळे उत्रादकर यांच्यासारख्या कादंबरीकारामुळे झालेली आहे. त्यात आता हक्कसोड सारख्या कादंबरी मुळे मिलिंद जाधव आणि आय पी एस मुळे रमेश सरकटे यांच्या नावाची आश्वासक भर पडली आहे. आयपीएस ही एक दीर्घ कादंबरी आहे, रमेश सरकटे यांचा नक्षली चळवळी आणि आदिवासी जनजीवन यांचा अभ्यास त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जातवार जीवनव्यवस्था याबाबतचे निरीक्षण या कादंबरीमध्ये उमटले आहे. खरे म्हणजे हे कादंबरी नक्षलवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या पोलिसाच्या संघर्षमय जीवनाची कथा सांगणारी आहे त्यात महाराष्ट्रातील समाजजीवनाचे चित्र ओघाओघाने आले तरी प्रभावीपणे येते. खंडू या सामान्य अशा तरुणाची गरीब परिवारातून पुढे येण्याची धडपड त्यातून वेगवेगळ्या प्रसंगाचे चित्रण कादंबरी पुढे नेत राहते. कधी शांताबाई आणि कौती यांच बेबी आणि खंडू यांच्या भेटीगाठी मधून भदाणे नावाचे शिक्षक आणि पाटलाची बेबी यांच्यातील संबंधाचे बिंग फुटते, तसे पाहता मानवी मनाचा, प्रेमाचा वय जात धर्म यांच्यासोबत संबंध नसतोच मात्र तरीही शिक्षकाचे विद्यार्थीनी सोबत असलेले असे संबंध रमेश सरकटे आपल्या कादंबरीत मांडले आणि समाजाला पालकांना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खरेतर सावधतेचा एक सल्ला दिला आहे. हेच भदाने मास्तर खंडूला मटन आणण्यासाठी पाठवत असतात असा संदर्भही या कादंबरीत आहे. मात्र प्रसंगी खंडूची शांतामाय आजारी पडल्यावर झटपट पाचशे रुपये काढून देणारे हेच शिक्षक असतात. एकंदरच परिस्थिती आणि वेळ माणसातील चांगला आणि वाईट माणूस दाखवत असते हेच खरे. शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या विषयावर भाषण देणारा खंडू मोठे झाल्यावर नाव काढणार असे सुचवणारे लेखक खरे म्हणजे परिवर्तन वादाची ओळ ह्या ठिकाणी पेरतात ह्यात शंका नाही. "आज-काल काखेत घटनेच पुस्तक घेऊन बोटाने इशारे करणारे बाबासाहेब दिसत. त्याला वाटते की तो इशारा आपल्याले त नायी? असं जर असेल त लेका खंड्या मेहनत करावीच लागिन. मेहनतीने माणूस मरत नाही उलट मोठा होतो" खंडूचा आदर्श आणि प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ह्यात शंका नाहीच मात्र डॉक्टर बाबासाहेब बोटाने आपल्याला इशारा करतात असे जेव्हा खंडू सारख्या प्रत्येक तरुणाला वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने समाज प्रगतीपथावर गेला असे म्हणता येईल. स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यातून पहिला आलेला खंडू खुर्चीवर बसू नये म्हणून समोर फक्त दोनच खुर्च्या ठेवणे, भदाणे मास्तरच्या मनात बेबी सोबत शरीर संबंध ठेवण्याची इच्छा दिसणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक होणे त्यात पिरा आबा खतम होणे, शाळेमध्ये शांताबाईला खुर्चीवर बसलेले पाहून पांडू पाटलाला अस्वस्थ वाटणे अशा अनेक प्रसंगांमधून ग्रामीण भागातील जातीय विषमतेवर रमेश सरकटे यांनी भाष्य केलेले आहे. मात्र त्याचवेळी खंडू आणि पांडू पाटील यासारख्या समजदार व्यक्ती किंवा समज पूर्ण विचार करणारी विचारधारा असती तर जातीपातीचे भेद विसरून एक आपुलकीचे नाते तयार होते हे दाखवण्यात रमेश सरकटे यशस्वी झाले आहेत. या कादंबरीतील एक विलोभनीय टप्पा खंडू आणि सुमी यांच्यातील भावनिक ऋणानुबंध हे होय. सैराट चित्रपटातील नायक नायिकेप्रमाणे शालेय जीवनामध्ये हुशार विद्यार्थी आणि त्याची वर्गमैत्रीण यांच्यातील फुलत जाणारा प्रेमभाव यशस्वीपणे मांडण्यात कादंबरीकार यशस्वी ठरले आहेतच मात्र खंडू आणि सुमी या पात्रांचे एकमेकात गुंतून झाले आणि त्याचवेळी आपल्या ध्येयाने पुढे पुढे वाटचाल करणारा नायक आपल्याला भेटतो. स्त्री-पुरुषाचे अनैतिक संबंध, शासनाने शिक्षणाची जबाबदारी घेऊन लाभार्थीपर्यंत फायदा न पोहोचणे, संपूर्ण स्वच्छता अभियान अंतर्गत हागणदारी मुक्त गाव अशा अनेक ग्रामीण जीवनामध्ये दिसून येणाऱ्या घटनांचा मागोवा सुद्धा या कथानकामध्ये उपकथानक का प्रमाणे यशस्वी रीतीने प्रभाव पाडतात. खंडू सारख्या सुशिक्षित तरुणाच्या विचारसरणीवर मार्गक्रमण केल्यास पांडू पाटलाला मिळणारा शासकीय दलितमित्र पुरस्कार, आणि त्यांच्या खेड्याला मिळणारा आदर्श गावाचा पुरस्कार यातून नवीन आणि शिक्षित वर्गाला नेतृत्वाच्या संधी उपलब्ध झाल्यास संपूर्ण गावाचा नव्हे देशाचा सुद्धा कायापालट होऊ शकतो याची जाणीवच रमेश सरकटे यांनी आपल्या कादंबरीत करून दिली आहे. विश्वास नागरे पाटील यांचे प्रेरक भाषण ऐकल्यामुळे आपण आयएस किंवा आयपीएस झालो असे सांगणारे अनेक जण भेटतात तोच धागा धरून संजय गजभिये नावाच्या अधिकाऱ्याचे भाषण आपण सुद्धा आय ए एस होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असा तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून खंडू विचार करतो तो प्रसंग आपल्या सोबत महाविद्यालयीन जीवनामध्ये घडला असावा इतक्या सहजतेने वाचकांचा ठाव घेतो. त्यातही पहिल्या परीक्षेत तहसीलदार झाल्यावर पुन्हा UPSC साठी प्रयत्न करावा की आलेली नोकरी स्वीकारून आपली गरिबी दूर करावी काही गरिबाला पडणारे प्रश्न सुद्धा कादंबरीतून आपल्याला भेटतात. किशोरदा नक्षलवादी चळवळीच्या मोठ्या गुन्हेगारांसोबत अगदी कसलाही संबंध नसताना आलेला संबंध हा या कादंबरीला किंवा खंडू च्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग आहे. त्यानंतर नक्षलवादी जीवन किती मानवता विरोधी आहे तसेच खंडू सारखे लोक नक्षलवादी अपहरण करून आणलेल्या लक्ष्मी सारख्या मुलीला बहिण बंधनमुक्त करू शकतात, आणि आयपीएस अधिकारी झाल्यानंतर नक्षलवादी चळवळीचा बिमोड करण्यासाठी नक्षलवाद्यांशी सशस्त्र लढा करण्यासाठीसुद्धा उभे राहतात. नक्षलवादी मध्ये सुद्धा जातीयतेच्या आणि विषमतेच्या भिंती आहेत हे सत्य मला तरी पहिल्यांदा आयपीएस या कादंबरीमुळे कळते असे कबूल करावेसे वाटते. आयपीएस अधिकारी झाल्यावर दिपाली सारख्या तरुणीला पुढे झालो अधिकारी पदावरील तरुणाला फशी पाडण्याचे कुटील कारस्थान व्यवस्थेकडून केले जाते मात्र जागृत तरुण आपली ध्येयनिश्चिती आणि सुमीवरील निर्व्याज प्रेमापोटी कोणत्याही बंधनाला आणि आमिषाला बळी न पडता आपले मार्गक्रमण करतो. खरेतर आंबेडकरी चळवळीत अनेक तरुणांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे असे या ठिकाणी निक्षून सांगावेसे वाटते. जातिभेद असेल अंधश्रद्धेविरुद्ध सुद्धा या कादंबरीमध्ये जाणीव जागृती करून दिली आहे. समाजातील अनेक ज्वलंत प्रश्न, पोलीस खात्यातील अंतर्गत राजकारण इत्यादी अनेक गोष्टी या कादंबरीतून रमेश सरकटे अधोरेखित केल्या आहेत. कादंबरीचे कथानक शेवटपर्यंत कोठेही भरकटत नाही, आशयाच्या मागणीनुसार पात्रांचे संवाद आणि परिसरा नुसार त्या संवादातील बोलीभाषा वापर लेखकाने केलेला दिसून येतो. आयपीएस अधिकारी होण्यासाठी काय काय करावे लागते? आयपीएस अधिकारी झाल्यावर अधिकारी म्हणून कसे असले पाहिजे? कोणत्या पद्धतीने काम केले पाहिजे? याचा एक सुंदर आविष्कारच खरेतर लेखकाने सादर केला आहे. सर्वसामान्यपणे आपसातील हेवेदावे विसरून पांडू पाटील आणि परबत बुवा किंवा खंडू च्या सांगण्यावर किशोरदा सारख्या गुन्हेगाराचे आत्मसमर्पण, सुमी आणि खंडू यांचे जातीपातीच्या पलीकडे जाऊन एकमेकांवर प्रेम करणे आणि शेवटी त्यांचे लग्न होऊन स्वप्नपूर्ती इत्यादी अनेक बाबी खरेतर स्वप्नरंजना प्रमाणे अतिशय वेगाने समोर येत राहतात आणि हो हे असेच पाहिजे होते असा स्वर वाचकाच्या अंतर्मनातुन येत राहतो हे या कादंबरीचे खरे यश आहे. एटीएस मुंबई येथे बदली झाल्याच्या आणि सुमी सोबत लग्न होण्याच्या वळणावर नक्षली किशोर दा याने अपहरण केलेल्या लक्ष्मी चे किशोर दा सोबत लग्न अशा सर्व सुखात्मक शेवटावर जवळपास साडेचारशे पानाची ही कादंबरी संपते तेव्हा पुढे काय होईल? पुढील कथानक काय असेल? या कल्पनेतून वाचकांची उत्सुकता कायम राहते. खंडू सारखे पात्र, सुमी, लक्ष्मी, पांडू पाटील, परबत बुवा त्याची बायको, खंडू पाटवाचे मुलं, गंगु, सुभाष, गंगु चे सासू-सासरे, कौती, बेबी, भिका, भदाणे सर, मोरे सर, संजय गजभिये असे अनेक पात्र ग्रामीण भागामध्ये तुम्ही आम्ही सातत्याने पहात आलो आहे तेच पात्र आपल्या कादंबरीबद्दल जिवंत करून रमेश सरकटे यांनी कादंबरीला संजीवन प्राप्त करून दिले आहे हे निश्चित, मात्र अथपासून तिथपर्यंत सर्व गोष्टी सहजतेने पूर्णत्वास नेणार खंडू एखाद्या चित्रपटातील नायकाप्रमाणे रोल मॉडेल असला तरी वास्तवात मात्र असे पात्र दिसत नाही याची खंत वाटते. तो समाजव्यवस्थेचा, तरुणाच्या मानसिकतेचा दोष आहे असे म्हणावे वाटते. पायगुण प्रकाशन अमरावती यांनी प्रकाशित केलेल्या आणि रमेश निनाची सरकटे या एका रेल्वे पोलीस अधीक्षकाने लिहिलेल्या या कादंबरीचे मुखपृष्ठ भुसावळचे हेडकॉन्स्टेबल श्री शंकर येडले या पोलिस विभागातील कलाकाराने काढले हासुद्धा एक दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे या कादंबरीची भाषा विदर्भ खानदेशी शब्दांनी ग्रामीण संदर्भासह व्यक्त झाली आहे, निवेदन गतिमान व प्रत्ययकारी आहे, प्रसंग चित्रण व व्यक्ति रेखाटन जिवंत उतरले आहे त्यामुळे कादंबरी सर्वार्थाने वाचनीय ठरली आहे . मुळात चळवळीशी नाते सांगणाऱ्या समर्थ गझलकार म्हणून ओळख असणाऱ्या रमेश सरकटे यांनी लिहिले आयपीएस ही कादंबरी खऱ्या अर्थाने मराठी कादंबरी, जीवन संघर्ष, ग्रामीण जीवनशैली, नक्षली जीवनशैली या सर्वांसोबत तरल प्रेमभावना आणि गाव ते शहर संपलेला बंधुभाव, ऋणानुबंध त्याच प्रमाणे ह्या अस्वस्थ आणि धकाधकीच्या काळातही अद्यापही झुळझुळणारा आत्मीयता आणि जिव्हाळ्याचा झरा प्रवाही ठेवण्याचे काम करते असे दिसून येते, रमेश निनाजी सरकटे यांच्या पुढील साहित्य प्रवासास खूप खूप शुभेच्छा!! किरण शिवहर डोंगरदिवे, वार्ड नंबर 7, समता नगर, मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा पिन 443301 मोबाईल 7588565576
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने