शेतकऱ्याच्या आयुष्यावर गझल लिहीतो आहे.
रखरखणाऱ्या प्रखर उन्हावर गझल लिहीतो आहे
शेतकऱ्याच्या आयुष्यावर गझल लिहीतो आहे
ज्या प्रश्नाने बळी घेतला माझ्या शेतकऱ्याचा
त्या जगण्यावर...त्या प्रश्नावर गझल लिहीतो आहे
ताटामधला काढुन ज्याने घास जगाला दिधला
त्या कर्णाच्या दातृत्त्वावर गझल लिहीतो आहे
मातीमध्ये जीव पेरुनी देश पिकवला ज्याने
त्यास मिळालेल्या फासावर गझल लिहीतो आहे
या हृदयाला हाय लागते इतकी लिहिताना की
असे वाटते..तप्त तव्यावर गझल लिहीतो आहे
शेतीवर, मातीवर अगदी त्याच्यावरही लिहिले
आता मी त्याच्या मरणावर गझल लिहीतो आहे
- Read more about शेतकऱ्याच्या आयुष्यावर गझल लिहीतो आहे.
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5964 views

Recent comments ताजे प्रतिसाद