माझ्या धन्यासाठी...
पडू दे पाऊस, भिजू दे या शिंगाला,
बळीराजा संकटात तरी साजरा करी या सणाला
दुःख त्याचे सांगतो माझ्या या कानाशी,
रडतो तो फक्त त्याच्याच मनाशी.
गहिवर दाटतो, हुंदके देतो स्वतःशीच,
एकटाच बसून भुईवर नाळ जुळवतो हिशोबाची
व्यथा या जीवाची न सांगतो तो कुणाला.
पडू दे पाऊस, भिजू दे या शिंगाला,
बळीराजा संकटात तरी साजरा करी या सणाला.
नाही पिकाचा भरवसा, यातनाही कमी नाहीत,
डोंगर उरावर असतानाही सेवा करतो आमची.
कसं पाहू रे डोळ्यांनी होरपळलेलं हे रान?
पीडा त्याची पाहून आसवे वाहतात डोळ्यांतून.
नको नको रे देवा, देऊ यातना माझ्या धन्याला.
पडू दे पाऊस, भिजू दे या शिंगाला,
बळीराजा संकटात तरी साजरा करी या सणाला.
येऊ दे या राजाला दिवस सोन्याचे,
दूर होऊ दे संकट त्याच्या दारिद्र्याचे.
मिळू दे सुख आभाळभर सदा त्याला,
देवा, आता तरी पाऊस पडू दे त्याच्या रानाला.
साद घालतो रे तुला, ऐकणाऱ्या विठ्ठला!
पडू दे पाऊस, भिजू दे या शिंगाला,
बळीराजा संकटात तरी साजरा करी या सणाला.
कवी : अनिलकुमार दत्तात्रय सानप

प्रतिसाद (1)
प्रभावीपणे मांडली आहे.
डॉ. मीरा पंडित
कवी अनिलकुमार दत्तात्रय सानप यांनी एका मुक्या जीवाच्या (बैलाच्या) नजरेतून बळीराजाचे दुःख आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता अत्यंत तरलतेने आणि प्रभावीपणे मांडली आहे.
या कवितेची काही खास वैशिष्ट्ये मनाला चटका लावून जातात:
• हृदयस्पर्शी कल्पनाविस्तार: शेतकऱ्याचे दुःख जगापासून लपलेले असले, तरी त्याचा खरा सोबती असलेल्या बैलाला ते बरोबर समजते. "दुःख त्याचे सांगतो माझ्या या कानाशी" ही ओळ वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावतात.
• अर्थपूर्ण ध्रुवपद: "पडू दे पाऊस, भिजू दे या शिंगाला" हे ध्रुवपद कवितेचा आत्मा आहे. स्वतः संकटात असूनही आपल्या सर्जा-राजाचा सण (बैलपोळा) उत्साहाने साजरा करणाऱ्या बळीराजाचे मोठेपण यातून सुंदररीत्या अधोरेखित होते.
• अस्सल ग्रामीण बाज आणि जिव्हाळा: कवितेतील शब्दकळा अत्यंत साधी, सोपी तरीही थेट काळजाला भिडणारी आहे. मालकासाठी विठ्ठलाला घातलेली आर्त साद वाचकांच्या मनात खोलवर घर करून जाते.
एकंदरीत, ही कविता केवळ शब्दरचना नसून एका मुक्या जीवाने आपल्या धन्यासाठी केलेली एक भावपूर्ण प्रार्थना आहे. इतक्या संवेदनशील आणि सुंदर रचनेबद्दल कवींचे मनःपूर्वक अभिनंदन!