*अवर्षण*
कसं पिसाळलं उन्ह
रानीवनी तापलेलं ,
खोडं झालं सरपन
काल वनी कापलेलं ।।
एका एका थेंबासाठी
सारे आतुरले जीव,
पान्हा आटला गाईचा
कशी घेऊ तिची कीव ।।
ओठ सुकले बाळाचे
तोंडी नाही येत थुकं,
नाही कणगीत दाना
कशी भागवू रे भूक ।।
भुई वानी फाकले रे
माह्या बा चे तळपाय,
पाणी आटल्या डोळ्याने
धीर देते माही माय ।।
सांग आतड्यांचा पीळ
आता कुठवर सोलू
तुह्या कृपेसाठी देवा
सांग काय मोल तोलू
गप् झाला कसा बाप
त्याची काळजी सुटु दे,
भाळावरल्या घामाचा
झरा आभाळा फुटु दे ।।
मंजूषा संजय कऊटकर (ग्रामगीताचार्य),
