ऐक रे !
या धरेचा राहिला सन्मान नाही,
वाळलेल्या जंगलाचे भान नाही।।
सुन्न झाल्या भावना अन् प्रेम खोटे,
माणसाला या जगाची जाण नाही।।
माणसा वागू नको उद्दाम ऐसा
अमर होण्याचे तुला वरदान नाही
ऐकतो येथे कुणाचे कोण हल्ली,
येथल्या स्वार्थास उजवा कान नाही।।
रोज देतो अर्ध्य घामाचेच शेता
राबणारा त्या करांना मान नाही।।
घे जराशी माखुनी तू बेइमानी
सज्जनाचे व्हायचे उत्थान नाही।।
मानवाला भव्य ही अधिवासस्थाने
पाखरांना झेप घेण्या रान नाही।।
झगमगाटी राहणे अन् ऐट न्यारी
ऐक रे! पण वागणे हे छान नाही।।
