बळीराजाचा पोवाडा
ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे,
करून प्रारंभे | डफावर थाप तुंनतण्याची,
शेतीला साथ शेतकऱ्याची | शेती हा महाराष्ट्राचा प्राण, बळीराजाचे गाऊ गुणगान जी जी...
बळीराजाचे गाऊ गुणगान जी जी..||१||
आधी नमन धरणी मातेला, शेती करणाऱ्या बळीराजाला| शेतकरी माय बापाला, शेतकरी पुत्राला ,शेतकरी कन्येला गोमातेला| शेतीमध्ये राबणाऱ्या बैलाला जी जी
राबणाऱ्या बैलाला जी जी....||२||
नमन माझे बी बियाण्याला, रासायनिक खताला,कीटकनाशकाला, तननाशकाला |वापरल्या जाणाऱ्या शेतीमधील तंत्रज्ञानाला जी जी,
शेतीमधील तंत्रज्ञानाला जी जी....||३||
नमन माझे शेती विचारवंताला, हरितक्रांतीला,स्वामीनाथन आयोगाला |शेती सुधार कायद्याला, महाराष्ट्र राज्याला, कृषी प्रधान भारत देशाला जी जी,
भारत देशाला जी जी.....||४||
जून महिन्यात पाहून पावसाच्या सरीला, आनंद झाला शेतकऱ्याच्या मनाला |
बी बियाणे, खते आणून घराला,
बाळाचा झोका बांधून झाडाला |
शेतकरीन ओटी बांधते पोटाला,
अनवाणी चालून शेताला |
काटा टोचला जरी पायाला,
शेतकरी पेरतो शेताला जी जी.
पेरतो शेताला जी जी .....||५||
निंदनी पिकाची करून, शेतीमालाला घेतो कोळपून |,तन नाशक कीटकनाशकाच्या करतो फवारणीला, कर्ज काढून करतो शेतीला | आशा त्याला भरपूर पिक येण्याची, रास धान्याची मोजण्याची जी जी.
रास धान्याची मोजण्याची जी जी ....||६|| पिकं आली सोंगनीला, मजूर मिळेना काढणीला | आकाशी पाहून दाटलेल्या नभाला, पिकं हातचे जाण्याच्या भीतीने |तीळतीळ तुटणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाला जी जी,
शेतकऱ्यांच्या काळजाला जी जी...||७||
पोटापुरते ठेवून धान्याला, बाजारी नेतो विकण्याला |कमी असल्या तरी किमतीला, विकावे लागते शेतीमालाला | जरी तोट्यात जात असली तरी, जागतो पूर्वजाच्या वचनाला | सोडत नाही शेती कसण्याला जी जी,
नाही सोडत शेती कसण्याला जी जी....||८||
शेतकरी पुत्र बोलला, जन्म शेतकऱ्यांच्या पोटी घेतला | गुन्हा असा काय मी केला, किती शोले जरी कष्ट शेतात |गरीबी नित्य असते घरात, दारिद्र्य वास करते अंगणात | पाहून गरिबी दारिद्र्य, कष्ट करून निघालेल्या घामाला | मिळत नाही मुलगी लग्न करण्याला जी जी,
लग्न करण्याला जी जी........||९||
खाते, बियाणे ,मजुरी ,डिझेल यांच्या किमती गगनाला भिडलेल्या, शेती करण्याचा खर्च वाढलेला | कोरडा दुष्काळ आला सोबतीला, पिके करपून गेलेली | कसे फेडावे म्हणतो कर्जाला, निघतो आत्महत्या करण्याला | या संकटातून शेतकऱ्याला, बाहेर काढण्याला धावून यावे बळीराजाच्या मदतीला जी जी,
बळीराजाच्या मदतीला जी जी.....||१०||
महाराष्ट्र राज्यात कोरडा दुष्काळ पडलेला, जागोजागी पाणी अडवून, पाण्याचा पुनर्वापर करून | मागेल त्याला विहीर देऊन, नद्या धरणांचे खोलीकरण करून | पाण्याचा करून पुनर्वापर, दुष्काळ निवारण करण्याला, एकमेकांच्या साथीने, सरकारच्या सहकार्याने , धावून जाऊ अन्नदात्याच्या मदतीला जी जी, अन्नदात्याच्या मदतीला जी जी....||११||
डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील
संत ज्ञानेश्वर महाविद्यालय
सोयगाव छ. संभाजीनगर
