अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४
नमस्कार मित्रहो,
ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रसारमाध्यम या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही पण;
आता शेतकर्यांच्या मदतीला नवीन संगणकीय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरजालाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच पहिली पायरी म्हणून आज सादर करीत आहोत.....
आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४
विषय : शेती आणि शेतकरी
या स्पर्धेचे दोन प्रकार असतील,
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ आणि पद्यलेखन स्पर्धा-२०१४
१] गद्यलेखन स्पर्धा-२०१४
विभाग : अ) ललितलेख ब) कथा क) वैचारिक लेख ड) शेतीविषयक माहितीपर लेख
२] पद्यलेखन स्पर्धा-२०१४
विभाग : अ) पद्यकविता ब) छंदमुक्त कविता क) गझल ड) गेय रचना/गीत (पोवाडा, अंगाई, लावणी इत्यादी)
प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.
स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:
१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. साहित्य अनुवादित असेल तर तसा स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.
२) पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात
३) एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त ३ प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.
पारितोषिकाचे स्वरूप :
प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.
निकाल :
२६ जानेवारी २०१५ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.shetkari.in या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.
पारितोषिक वितरण :
सन २०१५ मध्ये होणार्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :
१) स्पर्धा ०१ नोव्हेंबर २०१४ ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
२) लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन
येथे प्रकाशित करावे लागेल.
३) लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला
बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते.
४) स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह
spardha@shetkari.in या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
५) स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत माहिती
spardha@shetkari.in या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख/कथा/वैचारिक लेख/शेतीविषयक माहितीपर लेख/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे.
६) सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
७) स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
८) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
९) गद्यलेखनासाठी शब्दमर्यादा - १२०० शब्द एवढी असेल.
नियम व शर्ती :
१) स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
२) स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
३) स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
४) एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तर त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
५) परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील.
६) सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या
www.shetkari.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
७) एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
८) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
९) निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१०) शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती
आपले स्नेहांकित
डॉ. कैलास गायकवाड, विशाल कुळकर्णी, राज पठाण, कमलाकर देसले
संयोजक मंडळ
आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
काही महत्वांच्या सुचना/माहीती
काही महत्वांच्या सुचना/माहीती
१) या स्पर्धेचा निकाल अधिकाअधिक निर्दोष असावा म्हणून १० परीक्षकांचे एक मंडळ असेल. त्यांच्याकडून व्यक्तिश: आलेल्या गुणांच्या एकत्रीत सरासरीतून विजेते निवडले जातील.
परीक्षक मंडळामध्ये एक साहित्यिक, एक समीक्षक, एक पत्रकार, एक कलाकार, एक प्राध्यापक, एक शिक्षक, एक सामजिक कार्यकर्ता, एक राजकिय कार्यकर्ता, एक कर्मचारी आणि एक रसिक असणार आहे.
परिक्षक मंडळाची नांवे निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजे २६ जानेवारी २०१५ पर्यंत गोपनीय ठेवली जातील आणि निकाल जाहीर झाल्यानंतरच परिक्षक मंडळातील नावे उघड/जाहीर केली जातील.
२) गझलेमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त शेर असू शकतात. त्यातील प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते. प्रत्येक शेरात वेगवेगळे खयाल असतात. एकाच विषयाला वाहिलेली गझल असेल तर ती मुसलसल गझल ठरते. हा सर्व विचार करून स्पर्धा संयोजक मंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे;
ज्या गझलेत निदान तीन शेर शेतक-यांच्या जीवनाच्या निगडीत असेल अथवा एकांदरित गझलेचे अंतरंग/खयाल शेतक-यांच्या जीवनाच्या निगडीत असेल तर ती गझल या स्पर्धेच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरली जाईल.
---------------------------------------------------------------------------
शेतकरी तितुका एक एक!
पाने