दिक्षा
गावाकून निरूप आलाय
पावसापाण्याचं काय?
आभाळाला भिरूड लागलं
इकडं ठिपूस नाय...
भूईला तडे गेलेत
मनापरीस खोल
डोळ्यामंदी उरली नाय
उलीसीक बी ओल...
पाचुळ्यागत सुकलंय
जनावरांचं तोंड
भर पानकळ्यात आलीय
दु:काळाची धोंड...
चिमणीला चारा नाय
मुंगाला बी पाणी
कुणासठाव कशी आली
असली आणीबाणी...
मुक्यावं मर आलीय
देव कुठं झोपलाय
त्येंनी काय पाप केलंय
मनून ह्यो कोपलाय...
माणसाईच्या करणीची
पाखरांस्नी शिक्षा
दगडास्नी दिली आम्ही
देवपणाची दिक्षा..!!
~ साहित्यिक अनंत कराड.
