विकासाच्या रथाखाली स्वप्नांचा चुराडा!
विकासाच्या रथाखाली स्वप्नांचा चुराडा!
स्वप्नांची गाठोडी घेऊन
आली होती ती जादूगारणी,
विकासाच्या रथावर स्वार होऊन
सांगू लागली स्वप्नांची कहाणी!
'अर्थ'प्राप्तीच्या आशेने
सजला होता आश्वासनांचा मेळा,
अपेक्षांच्या पदरी निराशा पडली,
हाती मात्र उरला भोपळा!
जेवढे मिळाले, तेवढे तरी
लागेल का कधी सत्कारणी?
की पुन्हा आश्वासनांचा पाऊस
आणि निराशाच येईल पदरी?
'आज चालला जीव',
जगण्याचीच मोठी विवंचना,
म्हणे, 'आज जाऊ द्या,
बेरोजगारीचे नंतर पाहू ना!'
महागाईच्या वणव्यात
सामान्यांचे जगणे होरपळले,
लोकशाहीच्या आश्वासनांना
वास्तवाचे तडे गेले!
म्हणे, 'जिद्दीच्या पंखांवर
खुशाल आभाळी झेप घ्यावी',
पण रोजगाराच्या अभावी
आकांक्षांनी मान टाकावी!
अवाढव्य खर्चाचे शेतीतंत्र
बळीराजाच्या आवाक्याबाहेर,
अनुदानाच्या आशेने पाहता
मदतीचा पत्ताच नाही दारावर!
सेंद्रिय शेतीचा मंत्र सांगता
खर्चाचा मेळ बसेना,
बाजारभाव अन् उत्पादनखर्चाचे
गणित काही सुटेना!
मायबाप सरकारने केली
गरिबांच्या जगण्याची थट्टा,
ना दाद, ना दिलासा मिळाला,
पदरात पडली केवळ ससेहोलपट!
लालफितीच्या कारभाराने
स्वप्नांचाच बाजार लुटला,
सत्तेच्या बेफिकीर धोरणांनी
सामान्यांचा विश्वास तुटला!
संकल्पांचे इमले सारे
आश्वासनांतच विरून गेले,
नव्या स्वप्नांचे, नव्या आशांचे
क्षितिजही धूसर होऊन गेले!
स्वप्नांची पोटली घेऊन
आले होते कित्येक जण,
विकासाच्या बाजारात मात्र
रिकामेच परतले हात!
- सतीश शंकरराव पाटील,
जानकीबन बजाज ऑटो हौसिंग सोसायटी,
ब्लॉक नं. १७/२, सेक्टर नं. २७,
निगडी प्राधिकरण, पुणे- ४११०४४
भ्रमणध्वनी क्रमांक : ९८८११ ००५१५
- Read more about विकासाच्या रथाखाली स्वप्नांचा चुराडा!
- Log in or register to post comments
- 2 views
