असा इस्कटला कोवळा सपान....!!!
"....तर बरं का मुलांनो,सोमवारी सगळ्यांनी कार्डपेपर घेऊन यायचा आहे. आणि स्केचपेन्सहि! प्रकल्प कसा करायचा ते सोमवारी सांगितले जाईल..!" विज्ञानाचा तास संपल्याची घंटा झाली अन बाई वर्गाबाहेर पडल्या.
"गे आई,माका उद्या धा रुपये होये"
"कित्याक ते?" आईच्या कपाळावर पडलेली सूक्ष्म आठी बाबांच्या रिकाम्या खिशाचा अंदाज सांगून गेली.
"अगे,विज्ञानाचो एक प्रोजेक्ट करुचो आसा शाळेत!" ..नवीन काहीतरी शिकण्याच्या कौतुकाचे,औत्सुक्याचेच दिवस होते ते....!
"हां...बघूया...! या शाळेवाल्यांका पण दुसरे उद्योग नाय! कसले प्रोजेक्ट बिजेक्ट! काय काय नको ता याक याक...! चल...काळोख पडूच्या आधी पाणी भर बायर (बाय-विहीर) जावन आणि मी येवच्या आधी चुलीत आग पेटव्न आदान ठेय.(आदान-भात शिजवण्यासाठी तापवलेले पाणी)".............कपाळावरचा घाम टिपरीने पुसून टोपली घेऊन पुन्हा शेताकडे जाण्यास आई पायऱ्या उतरली..!
ओसरीवरच्या खांबाला टेकून तेजू आईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. तिचा सगळा उत्साह क्षणात मावळला. स्वतःचीच चीड आली. गपचूप पाठी वळून ती चुलीजवळ गेली. अल्युमिनीयमच्या टोपातला थंड उकडा भात तिची वाट पाहत होता. ताटात भात-आमटी वाढून घेऊन चिवडत ते थंड जेवण कसेबसे तिने संपवले. अन हात धुवून तशीच पाठच्या दारी पायरीवर बसून राहिली. परसाच्या कुंपणातून पाठीमागील घराच्या अंगणात सोबतच्या मैत्रिणींचा लगोरीचा खेळ रंगात आलेला दिसत होता. तेजुचे विचारचक्र फिरू लागले. सातवीत असतानाही हेच असेच झाले होते. शाळेत बाईंनी निवडक मुलांना हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सांगितले. फक्त सात रुपये प्रवेश फी होती. कौतुकाने आपण घरी येऊन सांगितले. तर सरळ बाबांनी “माज्याजवळ आता पैशे नाय” म्हणून धुडकावून लावले. शाळेतल्या मैत्रिणींना परीक्षेस बसत नसल्याचे सांगताच त्याही ओशाळल्या. आणि मग सर्वांनी १-१, २-२ रुपये खाऊच्या पैशांतून गोळा करून फॉर्म भरून मग आपण परीक्षा पास झालो होतो. तो फॉर्म भरतेवेळी आपल्याला अगदी कसेनुसे झाले होते. आजही ते सर्टिफिकेट पाहिले कि आपल्याला त्या प्रसंगाची आठवण येते. ....तेवढ्यात कुंपणापलीकडून लगोरीचा चेंडू परसात आला आणि तेजूची भावसमाधी तुटली. चेंडू देण्यासाठी ती उठली.
“काय गो? काय करतयस? ये खेळाक...!” चेंडू घेता घेता शेजारची चित्रा म्हणाली.
“नाय गो...खेळा तुम्ही...माका पाणी भरुचा आसा...!” तेजू वळली.
सकाळी उठल्यापासून घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे तिचे काम सुरु होत असे. भूपाळी ऐकत सकाळी उठण्याचे सुख तिने कधी अनुभवलेच नाही. अंथरुणात असतानाच हे करायचे आहे, ते करायचे आहे, उठतेस कि घालू लाथ या लाखोलींनीच तिची सुरुवात होत असे. मुखमार्जन करायच्या आधीच झाडू हाती घेऊन भलेमोठे अंगण, घर आणि आजूबाजूचा भाग झाडून काढावा लागे. विहिरीचे पाणी भरून, कपडे धुवून, दोन्ही भावांसाठी अन स्वतःसाठी डबा करून शाळेची तयारी करेपर्यंत तिचा जीव अगदी मेटाकुटीला येई. धावत पळतच शाळा गाठावी लागे. पुन्हा संध्याकाळी तासभर चालत घरी येईपर्यंत पोर दमून जाई. पण जेवल्यानंतर जराशी ग्लानी येऊन डोळा लागलाच तर काळोख पडल्याने पाणी भरले नाही म्हणून आईच्या शिव्या खाव्या लागत. ते इवलेसे रोप मग अजूनच कोमेजून जाई.
तेजुने रिकाम्या कळश्या धुवून घेतल्या. अन राजू (राजू-विहिरीतून पाणी काढण्याचा जाड दोर) घेऊन ती विहिरीवर निघाली. लगोरीचा खेळ रंगात आला होता. आपल्या आयुष्याची लगोरी कधी नीट लागेल या विचारातच पाणी भरून झाले. चुलीवर आंदण ठेवेपर्यंत बाहेर बराच काळोख पडू लागला होता. आई-बाबा शेतावरून परतले नव्हते. सकाळी रानात सोडलेल्या बैलांच्या घंटेचा आवाज ऐकू येऊ लागला. धावत जाऊन सकाळच्या भाताची उरलेली पेज घमेलात ओतून अंगणात येईपर्यंत बैलांनी अंगणाचा आडा शिंगांनी मोडून टाकला होता. अंगणातल्या तुळशीचे रोप आणि बाजूची छोटी फुलझाडे चाऊन टाकले होते. ओट्यावरच घमेले ठेऊन ती बैलांना बाहेर हाकू लागली. जवळपास काठीही भेटेना. कसेबसे अंगणाबाहेर घालवून त्यांना वाड्यात बांधून आली. तोपर्यंत बाबा आले. दिवसभरच्या श्रमाने वैतागल्यामुळे अंगणाची अन लावलेल्या फुलझाडांची अवस्था पाहून त्यांचे डोके आणखीन सणकले. मुकाटपणे शाब्दिक मार सहन करण्याशिवाय तेजुकडे गत्यंतर नव्हते.
रात्री जेवणं करतानाही दहा रुपयांची गोष्ट काढण्याचे धाडस तिला होईना. अंथरुणावर पडल्या पडल्या तिला आठवू लागले. गेल्यावर्षी शाळेत तालुकास्तरीय समूहगान स्पर्धेत आपण भाग घेतलेला. दरवर्षीच घ्यायचो. सरावात किती छान मन रमायचे आपले! उजव्या पायाचा मस्त ठेका धरून तालात म्हणताना किती छान वाटायचे..! स्पर्धेचा दिवस जवळ आला तसे सर्वांनी नवीन रिबन्स, एका हातात निळ्या बांगड्या अन दुसऱ्या हातात घड्याळ बांधायचे ठरवले. आपला हात मोकळाच होता. घरची परिस्थिती माहित असल्याने हट्ट धरूनही काहीच फायदा होणार नव्हता. मागच्या खेपेस बाबा शहरात गेले तेव्हा लहान भावासाठी घड्याळ घेऊन आले तेव्हा आपले मन किती खट्टू झाले होते. पण दिवसभर शेतात काम करून थकून गेलेल्या बाबांकडे चैनीच्या गोष्टी मागण्याचे बळ आपल्याला एकवटता येत नाही. लहान भावाला आणलेले मोठ्या अंकांचे, मोठ्या डायलचे, काटे नसलेले घड्याळ आपण बांधून गेलो होतो. पण इतर मुलींच्या हातातील नाजूक घड्याळे पाहून आपल्याला आपल्या परिस्थीतीची किती कीव वाटली होती त्यावेळेस...!
कूस परतता परतता आठवणींचे मोहोळ उठू लागले. पाठीचे दप्तर लागून लागून शाळेचा स्कर्ट विरून गेला होता. इन केलेले पांढरे शर्ट त्या विरल्या भागातून डोके वर काढून आपली असहाय्यता दाखवून देई. १५ ऑगस्ट जवळ येत चालला होता इतर वेळेस हात पाठीमागे मुडपून विरलेला भाग कुणास दिसणार नाही अशा बेताने आपण वावरत असलो तरी १५ ऑगस्ट ला सगळी शाळा मैदानात जमणार. सगळ्या मुलांचे नवीन कपडे असणार. अन आपणच तेवढे अशा जीर्ण फाटक्या कपड्यांत...! मुले पाहतील, हसतील, शिक्षकही टिंगलटवाळी करतील...! काय करावे बरे...काहीच सुचेना..! योगायोगाने आदल्या दिवशी वेन्गुर्ल्याची आत्या आली. तिने हाताने बेतून निळ्या कापडाचा स्कर्ट शिवला. बाबांनीही मग त्याला मशिनवर शिलाई घातली. दुसर्या दिवशी शाळेत जाताना आपला आनंद गगनांत मावत नव्हता.
त्यादिवशी शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा होती. आपल्या वाडीतल्या मैत्रिणीच्या घरी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शाळेतल्या मैत्रिणी आल्या. शाळेत अभ्यासात कितीही हुशार असलो तरी सुकत घातलेले गवत गोळा करताना मळक्या कपड्यांत, केसांत गवताच्या काड्या, घामेजलेले अंग अशा अवस्थेत त्यांना सामोरे जाणे आपल्याला किती जड जात होते. वरून मटकुळीने गवताचे गावे नीट देता येत नाहीत म्हणून बाबा ओरडत होते. आपल्याला किती अपमानास्पद वाटत होते ते सारे. समोरून येत असणाऱ्या मैत्रिणींची नजर चुकवून त्या नजरेआड होईपर्यंतचा २-३ मिनिटांचा वेळ एका युगासमान वाटला होता आपल्याला. अभ्यासातील हुशारीतून शाळेत मिळालेली सारी इभ्रत त्या इवल्याशा वेळात गमावून गेल्याची खंत अजूनही मनात कायम आहे. शाळेचा रस्ता आपल्या शेतावरून जातो. शेत कापणीच्या हंगामात शाळेतील मुले, शिक्षक यांच्या नजरांपासून लपतछपत भाताचे पेंढे डोक्यावरून वाहून नेताना मनाची किती घालमेल होते, दमछाक होते. का आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो? देवा,हा जन्म ठीकेय...पण यानंतर कधीही मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घालू नकोस ...
विचार करता करता तिचा डोळा लागला. दिवस सरत गेले. १२ वीत उत्तम गुणांनी तेजू पास झाली. तोपर्यंत घरची परिस्थितीही बऱ्यापैकी सुधारली होती. गेल्या २-३ वर्षात चांगला पाउस झाल्याने पीकपाणीहि छान झाले होते. त्यात रिझल्टहि छान आल्यामुळे पुढील शिक्षणाला घरून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा तेजुला वाटू लागली. मोठ्या भावाला शहरात शिक्षणास ठेवल्याने आपल्याबद्दलहि बाबांनी काहीतरी विचार केलाच असला पाहिजे अशी भोळी आशा तिच्या मनात होती. पण बरोबरच्या मुलांनी पुढील कॉलेजात प्रवेश घ्यायला सुरुवात केली तरी घरी काहीच हालचाल दिसेना. आणि मग एक दिवस अचानक बाबा जवळच्या कॉलेजचा फॉर्म घेऊन आले.
“मिया फॉर्म घेवन इलहय(आलोय). तो भर. उद्या वेन्गुर्ल्याक जावन आडमिशन करूया तुझा.” बाबा म्हणाले.
“पण माका पूढे इंग्लिश मधूनच शिकाचा आसा बाबा. भाईक तुम्ही चांगल्या प्रोफेशनल कोर्सला प्रवेश मिळवून दिलात. माका नर्सिंग करुचा होता,तर त्यासाठी लागणारे १०,००० रुपये पण तुम्ही अरेंज करूक शकल्यात नाय. म्हणून त्या स्वप्नार पण पाणी सोडलंय मी. आणि आता निदान तालुक्याच्या कॉलेजला तरी माका प्रवेश मिळवून द्या. तेवढा तरी करा माझ्यासाठी.” बोलता बोलता तेजुचे डोळे पाण्याने डबडबले.
“तालुक्याच्या कॉलेजसाठी लागणाऱ्या बसच्या पासाक लागणारे पैसे माझ्याजवळ नाय आसत. मी आणलय तोच फॉर्म भर.” असहाय्य बाबांचाही स्वर चढला.
“नाय...माका तालुक्याच्याच कॉलेजला जावचा आसा. काळाची गरज आसा बाबा. तुमका कसा समजावून सांगू? त्या हलक्या कॉलेजला जाऊन मराठीत शिकून काय करतलय मी पुढे. काहीच भविष्य नसतला असा शिकून. फक्त तीन वर्षांचो प्रश्न आसा बाबा. माका तालुक्याच्या कॉलेजला प्रवेश घेऊ द्या. एकदा नोकरीला लागलंय कि मग .........” तेजुला पुढे बोलवेना. तिचा स्वर कंपित होऊ लागला.
“मी आणलेलो फॉर्म भर. नाहीतर शिकूच नको पुढे.” परिस्थितीने पिचलेले बाबा तिच्यावर ओरडले. आणि तरातरा पावले टाकीत घराबाहेर निघून गेले.
तेजू कोसळली. भविष्याची जी स्वप्ने तिने रंगवली होती, क्षणात उध्वस्त झाली....राखेत मिसळली गेली. मूकपणे टिपे गाळण्याशिवाय तिच्या हाती काही उरलेच नव्हते. जन्मदातेच जन्माचे वैरी झाले होते. एव्हाना इतर मुले, सोबतच्या सर्व मैत्रिणी हव्या त्या कॉलेजेस, प्रोफेशनल कोर्सेसला प्रवेश मिळवून निघून गेले होते. आणि तेजू शेणाच्या टोपल्या, लाकडांचे भारे वाह्ण्यातच आपले अस्तित्व गमावून बसली होती. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातल्याचे दूषण देवाला देत बसण्यापलीकडे तिच्या हाती आता उरलेच काय होते??
- किशोरी रमाकांत नाईक
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
शिकण्याची धडपड
शेतक-याच्या प्रत्येक पिढीची. अगदी अशीच!
हेमंत साळुंके
अभिनंदन.
अप्रतीम. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन.
http://maymrathi.blogspot.com/
पाने