आम्ही शेतकरी...
आम्ही लहान आहो,
तुम्ही महान आहे.
सांगा कसा जगू मी,
शेती गहाण आहे...
गे माय भू आता या
कंठात प्राण आहे.
भोगून जन्म गेला,
वहिवाट वावराची.
कधी या सुखा न दिसली ही वाट या घराची...
बस एवढे कराना,
वाढीव दाम द्याना..
आम्हा कफल्लकाची,
इतकी तहान आहे...
सांगा कसा जगू मी
शेती गहाण आहे...
आजन्म नांदते ही,
पिंजऱ्यात लोकशाही.
सुकली कधी न अमुच्या, बोटावरील शाई.
उडते विमान तुमचे,
आमच्याच मेहनतीवर.
मग फास का बळीला,
साधा सवाल आहे.
गळफास का बळीला,
इतका सवाल आहे.
सांगा कसा जगू मी,
शेती गहाण आहे...
गे माय भू आता या,
कंठात प्राण आहे. आमच्यामुळेच अमुचा,
भारत महान आहे...
***
नरेंद्र भा. गंधारे.
हिंगणघाट, जि-वर्धा.
मो. ९२८४१५१७५६
