नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्राणप्रिय बळीमित्रास
अनादीकाळापासून तूच आहेस
बळीराजासोबत त्याच्या सुखादुःखात
त्याच्या बऱ्या-वाईट प्रसंगाचा
तूच खरा एकमेव साक्षीदार
त्याच्या माथ्यावर घोंगावणारे सावकारी कर्जाचे वादळ
हे खरं तर तूच थोपवत आलास वर्षानुवर्ष
तुझ्या कणखर साथीनेच कण न कण
पै न पै जोडतोय तो त्याच्या कनवटीला
खरंच बळीमित्रा तूच जाणलंय
त्याचं आभाळभर पसरलेलं घनदाट दुःख
तूच जाणल्या त्याच्या मेघांगत गच्च भरून आलेल्या भावना
तुझ्या धैर्यानेच लढतोय तो अस्मानी सुलतानी संकटाशी
सांग बरं ?
तुझ्याशिवाय त्याचा विश्वास कुणावर असेल खरं ?
चल राजा, सज्ज हो !
तुझ्या धण्याच्या उत्थानासाठी
घे परत तुझ्या झिजलेल्या खांद्यावर
त्याचं उरलंसुरलं अवसान
रोख त्याचे पाय गळफासाकडे वळणारे
दे ढुसन्या
त्याच्या पिढ्यानपिढ्या वसतीस आलेल्या दारिद्र्याला
घरात पसरलेल्या भयान काळोखाला
त्याला पिचून चेचून खाणाऱ्या सावकाराला
अन त्याचं दुःख न जाणणाऱ्या सत्ताधीशांला
सचिन शिंदे