बळीराजाचा पोवाडा
ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे,
करून प्रारंभे | डफावर थाप तुंनतण्याची,
शेतीला साथ शेतकऱ्याची | शेती हा महाराष्ट्राचा प्राण, बळीराजाचे गाऊ गुणगान जी जी...
बळीराजाचे गाऊ गुणगान जी जी..||१||
आधी नमन धरणी मातेला, शेती करणाऱ्या बळीराजाला| शेतकरी माय बापाला, शेतकरी पुत्राला ,शेतकरी कन्येला गोमातेला| शेतीमध्ये राबणाऱ्या बैलाला जी जी
राबणाऱ्या बैलाला जी जी....||२||
नमन माझे बी बियाण्याला, रासायनिक खताला,कीटकनाशकाला, तननाशकाला |वापरल्या जाणाऱ्या शेतीमधील तंत्रज्ञानाला जी जी,
शेतीमधील तंत्रज्ञानाला जी जी....||३||
नमन माझे शेती विचारवंताला, हरितक्रांतीला,स्वामीनाथन आयोगाला |शेती सुधार कायद्याला, महाराष्ट्र राज्याला, कृषी प्रधान भारत देशाला जी जी,
भारत देशाला जी जी.....||४||
जून महिन्यात पाहून पावसाच्या सरीला, आनंद झाला शेतकऱ्याच्या मनाला |
बी बियाणे, खते आणून घराला,
बाळाचा झोका बांधून झाडाला |
शेतकरीन ओटी बांधते पोटाला,
अनवाणी चालून शेताला |
काटा टोचला जरी पायाला,
शेतकरी पेरतो शेताला जी जी.
पेरतो शेताला जी जी .....||५||
निंदनी पिकाची करून, शेतीमालाला घेतो कोळपून |,तन नाशक कीटकनाशकाच्या करतो फवारणीला, कर्ज काढून करतो शेतीला | आशा त्याला भरपूर पिक येण्याची, रास धान्याची मोजण्याची जी जी.
रास धान्याची मोजण्याची जी जी ....||६|| पिकं आली सोंगनीला, मजूर मिळेना काढणीला | आकाशी पाहून दाटलेल्या नभाला, पिकं हातचे जाण्याच्या भीतीने |तीळतीळ तुटणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाला जी जी,
शेतकऱ्यांच्या काळजाला जी जी...||७||
पोटापुरते ठेवून धान्याला, बाजारी नेतो विकण्याला |कमी असल्या तरी किमतीला, विकावे लागते शेतीमालाला | जरी तोट्यात जात असली तरी, जागतो पूर्वजाच्या वचनाला | सोडत नाही शेती कसण्याला जी जी,
नाही सोडत शेती कसण्याला जी जी....||८||
शेतकरी पुत्र बोलला, जन्म शेतकऱ्यांच्या पोटी घेतला | गुन्हा असा काय मी केला, किती शोले जरी कष्ट शेतात |गरीबी नित्य असते घरात, दारिद्र्य वास करते अंगणात | पाहून गरिबी दारिद्र्य, कष्ट करून निघालेल्या घामाला | मिळत नाही मुलगी लग्न करण्याला जी जी,
लग्न करण्याला जी जी........||९||
खाते, बियाणे ,मजुरी ,डिझेल यांच्या किमती गगनाला भिडलेल्या, शेती करण्याचा खर्च वाढलेला | कोरडा दुष्काळ आला सोबतीला, पिके करपून गेलेली | कसे फेडावे म्हणतो कर्जाला, निघतो आत्महत्या करण्याला | या संकटातून शेतकऱ्याला, बाहेर काढण्याला धावून यावे बळीराजाच्या मदतीला जी जी,
बळीराजाच्या मदतीला जी जी.....||१०||
महाराष्ट्र राज्यात कोरडा दुष्काळ पडलेला, जागोजागी पाणी अडवून, पाण्याचा पुनर्वापर करून | मागेल त्याला विहीर देऊन, नद्या धरणांचे खोलीकरण करून | पाण्याचा करून पुनर्वापर, दुष्काळ निवारण करण्याला, एकमेकांच्या साथीने, सरकारच्या सहकार्याने , धावून जाऊ अन्नदात्याच्या मदतीला जी जी, अन्नदात्याच्या मदतीला जी जी....||११||
डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील
संत ज्ञानेश्वर महाविद्यालय
सोयगाव छ. संभाजीनगर

प्रतिसाद (1)
डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, …
डॉ. मीरा पंडित
डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, 'बळीराजाचा पोवाडा' वाचताना डफाची थाप आणि तुणतुण्याचा झंकार कानांत घुमू लागतो. महाराष्ट्राच्या या अस्सल लोककलेच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या अन्नदात्याचे दुःख, कष्ट आणि त्याचा त्याग ज्या ताकदीने मांडला आहे, त्याला खरंच सलाम!
या पोवाड्याची सुरुवातच अत्यंत भव्य आणि कृतज्ञतेच्या भावनेने झाली आहे. जगदंबेपासून ते धरणीमाता, बैलजोडी, बी-बियाणे, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि हरितक्रांतीच्या शिल्पकारांना केलेले नमन रचनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. पावसाच्या सरींसोबत सुरू होणारी शेतकरी जोडप्याची लगबग, झाडाला बांधलेला बाळाचा झोका, अनवाणी पायांना टोचणारे काटे सोसून केली जाणारी पेरणी हे सर्व प्रसंग वाचताना प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे राहतात.
कष्ट करूनही हाती न लागणारा योग्य भाव, अवकाळी पावसाची भीती, शेतकरी पुत्राच्या लग्नाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि दुष्काळाच्या संकटात खचून जाणाऱ्या बळीराजाची व्यथा तुम्ही अत्यंत संवेदनशीलतेने टिपली आहे. मात्र, केवळ व्यथा मांडून न थांबता शेवटच्या कडव्यात जलसंधारण, पाणी अडवणे आणि सामूहिक मदतीचा दिलेला सकारात्मक संदेश या पोवाड्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देतो.
अस्सल ग्रामीण बाज, प्रवाही शब्दकळा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी ही एक अत्यंत दर्जेदार साहित्यकृती आहे. बळीराजाचा हा गौरवगाथा रचल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!