देशात राहतो मी
पेरून एक दाणा पोत्यात मोजतो मी
कित्येक या जगाच्या पोटास पोसतो मी
आलीत संकटांची कित्येक वादळे ही
झोपून शासनाची औलाद पाहतो मी
नाहीच मंदिराच्या मूर्तीत देव आता
रंकात सापडावा तो देव शोधतो मी
ध्येयात शासनाच्या आली इथे तिजोरी
लाभांश ठेवण्याची जागाच धुंडतो मी
पाठीत खंजराचे कित्येक वार झाले
माझ्याच माणसांचे आघात झेलतो मी
सत्तेपुढे शहाणे लाचार मेंढरे ही
मानाच वाकलेल्या देशात राहतो मी
डॉ.गिरीधर शं. काचोळ,
हिंगणघाट
मो.नंबर - ९७६५०३८६२४

प्रतिसाद (1)
अन्नदात्याची व्यथा
डॉ. मीरा पंडित
डॉ. गिरीधर शं. काचोळ यांची 'देशात राहतो मी' ही गझल अन्नदात्याची व्यथा, शेतकरी जीवनातील संघर्ष आणि व्यवस्थेचे दाहक वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडणारी अप्रतिम रचना आहे. साध्या पण वज्रलेप शब्दांत लिहिलेला प्रत्येक शेर वाचकाला अस्वस्थ करतो आणि विचारास प्रवृत्त करतो. सामाजिक वास्तवाचे परखड दर्शन घडवणारी ही एक अत्यंत संवेदनशील आणि दर्जेदार गझल आहे.