नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
******* वादळ ******
नुकतीच पज्याने आंघोळ करून वडीलांच्या फोटो पुढं उदबत्ती लावली होती. कोवळ्या सोनेरी उन्हात सुनंदा आपला धंदा करत होती नि पज्याकडं पाहून घळा - घळा अश्रू गाळीत होती. आपला नवरा मेला नस्ता त पज्यानं शाळा सोडली नस्ती. तो वावरात राबला नस्ता. तो नवकरीवर लागला अस्ता. लोकांच्या पोरावानी त्यांनंही आपली बिल्डींग बांधली अस्ती. गाडी घेतली अस्ती. अशा विचारांच्या धुक्यात ती गुंग होऊन सारवण करत होती.
पज्या बापाच्या फोटो पुढून बाजूला झाला. वावरात जासाठी लगबग करू लागला. आपल्यावर सारी घरची जबाबदारी आली हाये. आपली बहीण लग्नाले झाली. एक बहीण शिकत हाये. तिला शिकवाचं हाये. घरची अब्रु उंबरट्यावर हाये न् आपण एकटाच हावोत. आपल्याला रसिकाच लग्न उकरावा लागेल. असा विचार करून त्याने आपल्या मामाला- बंडूला फोन केला. रसिकासाठी चांगलं स्थळ बघायला सांगितलं. आणि सकाळच्या किरणांसोबत शेतावर निघाला.
वावराच्या मेरंवून पज्याला आपल्या भाजीपाल्यात पंधरा वीस वानरांचा कळप दिसला. तो कळप साऱ्या भाजीपाल्यामध्ये फळा फुलांचं लग्न लावत होता. कोणी वांगीचे वांगे खावून उड्या मारत होते. तर कोणी भेद्रीचे भेद्र खावून आडवे उभे उलथे - पालथे होऊन झोपत होते. तर काही हरभऱ्यात हरभऱ्याच्या घाट्या तोडून आस्वाद घेत होते. आनंदानं मिटक्या मारत खात होते. सारा चेंदाडा चेंदाडा करून टाकला होता. हे सारं त्याला पाहूल्या जात नव्हतं. असह्य होत होतं. त्याने सारं पाहून खोपड्यावरचा लांब वेळू घेतला. त्याला लाल फडकं बांधलं नि तो किलाऱ्या मारत त्यांना ' त्तर त्तर ' करून त्यांना पळवून लावू लागला. त्याला पाहून काही भडे दात दाखवत होते. तर काही दातांवर दात रगडत होते. चिल्ली पिल्ली पोरं किचकिच उंदरावानी करत होते. मग पज्याने खोपड्यातून सुतळी बॉम्ब आनले, फोडले तेव्हा कुठे ते पळून गेले. पण कवा वापस येईन ह्याचा नेम नव्हता.
मानसासारखं पशुपक्षांना जीवन जगाचा अधिकार हाये. ह्यासाठी सरकारनं वन्यजीव संरक्षण कायदा केला. आणि आत्ता हाच कायदा आपल्या बापायच्या जीवावर उठला. जंगलातल्या वन्यप्रान्यामुळे आपण असुरक्षित हावो. हे प्राणी आपल्या पिकाचे किती नुकसान करते. आण् मंग आपल्याले आर्थिक ताण घूट घूट पाणी पाजते. भर डोळ्यादेखत आपल्या पिकावर हल्ला चढवते. आण् आपण ठंडेच राह्यतो. का ? त कायदा. ह्या कायद्याने आपल्याले हतबल करून टाकलं. पेरणीपासून हातात येई पर्यंत आपण डोयात तेल घालून दिवस रात्र राखाचं. नाना तऱ्हेचे बंदोबस्त कराचे. आणि यांनी असा उपद्रव माजवाचा. तिकडं व्यवस्थेतील रानडूकरं, रोई, वान्नेरं खाते. आणि इकडं आपले काटेरी तारांचे कुपं वलांडून इकडचे रानडूकरं, रोई, वान्नेरं दमास आणते. विचार करत पज्या ढोरायची झाडझूड करत होता.
यंदाचं शेतीत राबाचं पज्याचं पहिलंच वर्ष होतं. त्यांने वांगी, फुल कोबी, पत्ता गोबी, शेवंती, पालक, मेथी, संबार, टमाटर नि मिरची लावली होती. पण यांच्यावर संकटं मात्र दिवसा रात्री येत होतं. तरी कसा बसा आडत पाडत रात्री जागल करून तो रक्षण करत होता. सारा भाजीपाला व पीकं आभाळाकडे केविलवानी पाहून काळी ठन्नं पडली होती. वांगे चिमून जमिनीला टेकले होते. तर शेवंती माना वाकून सुन्न पडली होती. पालक, मेथी, संबारांनी चिमून आंग टाकले होते. तर मिरची चिमून आभाळाकडं पाहात उभी होती आणि भेद्रीला त उंदरांनी टोचून टोचून काढले होते. नि आता तर वानरांनी हातात आलेल्या पिकांवर धूडगूस घातली होती. सारी भाजीपाल्याची ऐशी की तैशी केली होती. ही परिस्थिती पाहून पज्याच्या अंगावर काटा थरारला. त्यालाही काही वेळासाठी आपलं जीवन असच सुन्न झालं. सतरा जागेवरून भोकं पडलेलं वाटलं. टमाटरला टोचनी मारली नसून आपल्या काळजाला त्यांनी टोचनी मारली असं त्याला वाटत होतं. लुटलेल्या पिकाच्या वेदना पज्याच्या डोळ्यातून गळत होत्या. गव्हाले, चन्याले आता सोंगा लागते. कापूस फुटून हाये. शेवटचा फेर वेचा लागते. पण वेचाले मजूर नाही. या विचाराने पज्या अस्वस्थ होवून आपले गुरं वेचलेल्या पऱ्हाटीत बांधत होता.
ऊन्हाळ्यावानी ऊन ताप हाये. आण् गेल्या हप्त्यापासून वावरातली लाईन अजून नाही. कुठं फाल्ट हाये. कोणी पाहतही नाही. न् येतही नाही. आपल्या खुट्यावर चार ढोरं हाये. भाजीपाला, उभं पीक हाये. सारं पाण्याविन्या कासाविस झालं. याचा काही तरी बंदोबस्त करा लागन. अशा विचाराने पज्या पिसाळल्यागत करत होता. याच विचारात तो शेजारच्या नाना आबाजीच्या शेतावर आला व त्यांना म्हणाला,
" आबाजी लाईन कवा बराबर होईन. कवा येईल लाईन. "
" मी का सांगू बाप्पा ! आपलच लाईनी पासुन अडते. म्हनून आपल्यालेच लाईनीची कडकड हाये. ज्यांचे ढोरं नाई. ज्यांचा भाजीपाला नाई. ते फक्त आपला तमाशा पाह्यते. त्यांना काई कराचं नाई. आत्ता आपल्यालेच जे करा लागन थे करा लागन." नाना आबाजी थकल्यावानी एकाकी नाराज होऊन बोलले. पज्या विश्वास देत बोलला, " आबाजी तुम्ही तयार असन त आपण दोघं मिळून पैसे काढू नं लाईनमेन पाहून कुठं फाल्ट हाये थे पाहू.."
" पण पज्या आपण दोघांनीच पैसे लावून लाईन दुरस्त कराची. नं मंग साऱ्यांनी मजा घ्याची. हे कोणं सागितलं..राहू दे..त्यांनाच गरज नाई त आपल्याले कायची आली. "
"पण आबाजी आपण रात्रीचा दिवस करून पीकं पेरली, ऐवढी मोठी केली. उन्हातान्हांत राबलो. पाऊस धारेत भिजलो. न् आत्ता चार पैशासाठी कायले मांगं पाह्यचं. जावू द्या त्यायले. आपल्यामुळे सारी शेतमाऊली हरकून जाईल. आपल्यावर कृपा करेल. शेतकरी कवा एक आले व्हते त आता या नासुकल्या कामासाठी एक येईल. जाऊ द्या त्यांचं. आपण आपलं पाहून लाईनमेन आनू...मंजूर हाये का तुम्हाले ?"
" बरं जा. घेवून ये मंजूर हाये मी " नाना आबाजीचे उद्गार ऐकून पज्या गावात आला.
पोटात कावळे कावकाव बोंबलत होते. पज्या घामाने डबडबून गेलेला. तो तसाच कावर कावर करत बेघारावर बापू लाईनमेनच्या घरी आला. त्याने त्याला घरी पाह्यलं. तर तो दारू ढोकसून बडबडत झोपून होता. बापू लाईनमेनला अशा अवतारात पाहून तो पुन्हा उदास झाला. केविलवाणा झाला.
तो तसाच तिथून पलटून अल्लीपुरला गेला व अल्लीपुरातील प्रत्येक लाईनमेनच्या घरी जावून लाईनमेनचा शोध घेतला. कोणी गावाला गेला. कोणी कामावर गेला. कोणी लग्नाले जाणार होता. तर कोणी दारू पिवून घरी पसरला होता. शेवटी बाजारात एक लाईनमेन मोठ्या मुश्किलने भेटला. त्याला दोन वाजता का होईना आखिर शिवारातील डी. पी . वरती चढवलाच. त्यांने फाल्ट पाहून लाईन दुरस्त करून दिली. तेव्हाच पज्याने उपाश्यापोटी भाजीपाल्याले पाणी वलाले सुरूवात केली. तहानेने व्याकुळ झालेलं सारं पीक पाणी पिऊन हरकून गेलं. सुखावून गेलं. वाऱ्याने वारा घालून त्यांना झोका दिला. त्यांच्यात चैत्यनं संचारल. व सारं पीकं पज्याकडे पाहून हसू लागलं. नाचू लागलं. डोलू लागलं. पीकांचं वाऱ्यासंगे डोल्नं पाहून पज्याची भूक नाहीसी झाली. पज्याही अस्वस्थ गंभीर झालेला मिरगातील पाणी आल्यावर जसा हर्ष होते तसा तो हर्षून गेला.
" पज्याsss गहू काडते का ? हार्वेस्ट आलं हाये ? " नाना आबाजीने आपल्या मेरंवून हाक देवून विचारलं. त्यावर तो बोलला,
" नाही आबाजी, मंग चाऱ्याची बैलांसाठी आप्पतं येते. गव्हांडा असला त त्यात कनिक कुट घालून बैलं कसेही खाते. म्हणून माह्या विचार हाये का, खेशरनं गव्हू काढाचा!" असं ऐकून नाना आबाजी आपला गव्हू हार्वेस्टरनं काढू लागला.
बारा-एक वाजलेले. अजून पज्या घरला आला नाई. या चिंतेनं सुनंदा पज्याची भाकर घेवून शेतावर आली. सुनंदा पज्याले पाणी वलतांना पाहून व त्याची पिकाबद्दल, जित्रूबा बद्दल तळमळ व जिद्द पाहून मनातल्या मनात ती खुष झाली. न् धुऱ्यावून म्हणाली,
" पज्या, दे मी पाणी वलते. जा तू जेवून घे..?"
" नाही वं...तू जा घरी. उद्या पाव्हने येणार हाये रसिले पाहाले...मले मगाच मामाचा फोन आलता..तर तू जा....बाबा होता तवाही तुले सुख नाही मिळालं...आता मी हाये...जा तू..दे ती भाकर मी पाणी वलता वलताच खातो.." असं पज्याच बोल्नं ऐकून तिला एकदम भडभडून आलं. नि तिच्या डोळ्यात पाणी खळाळलं. ती तसीच पदराच्या शेल्याने अश्रू पुसत घराकडं कलली.
दिनभराचे पाखरं दाने खावून आपल्या दाराकडे कलले होते. पश्चिमेला तांबूस रंगानी क्षितीज चमचमीत झालं होतं. नि अंधाराने हळूच आपली सावली सृष्टीवर टाकली होती. पज्या दिनभराच्या कामाने शीनून-भागून घरला आला.
पज्या बघायला सावळा चरचरा मायवानी होता. तो उंचपुरा धिप्पाड देहाचा नि पाणीदार डोळे असलेला अठरा वर्षाचा तरून होता. नुकतीच त्याले मिशीची कोर आली होती. दाढी बाकीच होती. पज्या चांगला पंचीस - सव्वीस वरशाच्या पोरासारखा अंगानं थोराड दिसे. पज्याचं आंग व्यायामाने कसून होतं. त्याचे दंड पिळदार व टनक होते. छाती चांगलीच रूंद व पोट वळणदार होतं. त्यांला आर्मीत भर्ती व्हायचं होतं म्हणून त्याची तैयारी सुरू होती. परंतु बाप मेला नि तो जवान व्हायचा तर तो किसान झाला. तेव्हा त्याला शेतीतलं ढोरांच्या चाऱ्यापाण्या शिवाय काही जमत नसे. सुनंदाने त्याला सारे कामं कसे करायचे ते शिकवून दिलं होतं. आउत कसं जूतायचं. कसं हानायचं. आखूड-लांब कसं करायचं. फवारनी कशी करायची. पाणी कसं ओलायच. वाफे, गादी वाफे, नांगरणं, डवरनं, निंदन, खुरपण सारं सारं सुनंदाने मायचा बाप होऊन त्याला शिकवलं होतं. पज्याची नुकतीच बारावी झाली होती. तो आता शिक्षणाला पुर्ण विराम देवून शेती कसत होता.
जेवन-खावन करून पज्या बाजंवर पडला. टि. व्ही. बघता-बघता डोळे लावू लागला. रात्रीचे अकरा वाजले होते. एकाकी वारं सुटलं. पोर्णिमेचा चंद्र काळ्या ढगांनी झाकून गेला. सर्वत्र काळोखाने हजेरी लावली. वादळाने संपूर्णता हाहाकार माजवला. धूळने दारं खिडक्यातून आपली जागा भांड्या कुंड्यावर तसेच घरभर केली. दाही दिशात विजा कडकडाडत होत्या. विजांचा अक्राळ - विक्राळ गरजनाने बांडे बुचे इल्ली पिल्ली पोरं रडत होते. आयांनी दुध भरवून वाळवण चिळवन सावडायला सुरवात केलेली होती.
" पज्या, आरे ! उठ. केताड सुटलं....चाल वावरात कुटार झाकाले ?" अशा घाबरटलेल्या आवाजात पज्याले बाहेरून हाक आली. पज्याच्या डोळ्यातील झोप खाडकन पळून गेली. तो उठून बाहेर आला. त्याने दार उघडले. तर नाना आबाजी दारात ताडपत्री घेवून उभे होते
पज्याने खिळ्याचं कुडतं आंगात चडवलं. आड्यावरची ताडपत्री बगलेत मारली. नाना आबाजी संग तडाक्याने धावती पावलं उचलत वावर गाठंलं. पज्याने नाना आबाजीला घेवून सोयाबीन व तुरीचं कुटार झाकलं. ह्याच्या जवळच असलेल्या खोपड्यात बैलं-गाई वासरं बांधले. नि नाना आबाजीच्या वावरातील कुटार, गुरं-ढोरं बांधून घरला परतले.
गावात कोण्याच्या टिना उडल्या. कोणाचे इमले बुद्दूसहीत उघडे पडले. बकऱ्या, गुरं - ढोरं मँss....मँss....आकांत मांडू लागले. कोण्याचे कडे, प्लास्टीक ड्रामं कुठच्या कुठं उठून पळाले. दाराचे पडदे तर कराकरा तुटून हवेत गेले होते.
वारं रो...रो...करून झाडंच्या झाडं मोडू लागला. चिमनी, पाखरं, बगळे, कावळे घरट्यासहीत सांडू लागले. त्यांच्या अंड्याचा उग्र वास गावरानात सैरावैरा पसरू लागला. मेलेल्या पक्षांचा सात्राच्या सात्रा चोहीकडे पडू लागला.
पक्की गार होणार आता. आता पुर्णपणे मेलो आपण. देवा पांडूरंगा गारपीठ नोको येवू देवू रे ! आमचा गहू, हरभरा काडू दे ! नं मंग कितीक तुले पाणी पाटवाचा हाये त पाठव. पज्याच्या अंतकरणात कालवाकालव सुरू झाली होती. गराडानं भयभीत झालेले सारे गावातील लोकं पांडूरंगाले मनोमनी साद घालू लागले होते.
इतक्यात पज्याच्या वावराउज्जं लालबूंद वनवा लागलेला गावातील मोतीराम काकाले दिसला. त्यांने तशीच आरोळी गावात ठोकली,
" आरे धावा रे ! वनवा लागला पज्याच्या वावराउज्ज. पाहा रे कोणाचं पेटलं त ? "
" धावा धावा आग लागली. धावा पज्याच्या वावराकडं !" असा पज्याचा मित्र - अमल्या माडीवरचे गव्हू सावडता सावडता जोरजोरात बोंबलला.
असं ऐकताच गपकन पज्याच्या छाताड्यात धक्का बसला. एखादी मोठा ट्रक दूचाकीला धडकते तसा. पज्याले थरकाप सुटला. नि तो तसाच वावराकडे गाडीसारखा सुसाट पळाला. सुनंदा, रसिका, राणी व गावातले सारे तरणीताठी पोरं , माणसं बिनसं बुढेबाढेही त्यांच्या मांगं पळाले.
भलामोठा उभारा लपक्या मारत आभाळाले भिडत होता. जळका उग्र कुबट वास सर्वत्र पसरला होता. कुठं धूपट दिसे. कुठे धावती आग दिसे. असं पुढचं चित्र पाहून पज्याने दूरूनच डोळे भरून आरोळी मारली,
" आरेsss धावा गा..माह्यी जनावरं सोडा गा....गहू विजवा रे...कोणी हरभरा तरी वाचवा रे..!" नि तसाच तो खाली कोलमडला.
बेघारावरच्या बापू लाईनमेननं गाई वासरं सोडले. बैलाला आस लागून दोन्ही बैलाचे केसं जळून खाली पडून ते तडफडत होते. एका वासराने सोडल्या बरोबरच जमीनीवरती तडफडा सोडला. नि काही घटकात त्याने जीव सोडला. आपलं पोर उतानं चित पडलं. त्याला अग्नीने कुशीत घेतलं. हे पाहून गाय हंबरडा फोडत होती.
पसळासाचे फांटे, गोदणीचे फांटे मोडून कोणी जसी जमते तसी आग विजवू लागले. कोणी विहीरीचं पाणी काडून फेकू लागले. सरपंच्याने अग्नीशामकला फोन लावला. अग्नीशामक तालूक्यावरून सायरन वाजवत वाऱ्यावानी सुटलं असं कानोकानी शिरलं.
इतक्यात दोन्ही बैलाने आपले प्राण भुईच्या पदरात सोडून दिले. पज्या, सुनंदा, रसिका व राणी सारे एकमेकांचे गळे धरून आकांत माडू लागले. छातीवरती, मस्तकावरती हात ठेवू ठेवू रडाभड्डा करू लागले. यांचा केविलवाणा आरडा ओरडा पाहून पाहण्याऱ्या लोकांच्या डोळ्यात पाझर फुटलेला होता. काही माताऱ्या कोताऱ्या बायां- मानसं सुनंदा, पज्याले समजूती घालत होते. धीर देवून शांत करण्याचं काम करत होते. माय जशी लेकाला मिठीत घेवून समजूत काढते तसं सारं सुरू होतं. सहानुभूती दाखवूनही पज्या काही गप्प राहत नव्हता.
"माह्य लाखो रूपयाचं पीक जळून राख झालं. थ्या दिवशी हार्वेस्टर नं काढलं अस्तं त बरं झालं अस्तं." पज्या रडरड रडत अश्रू पुसत नाना आबाजी जवळ बोलत होता. तोंडा म्होरंची भाकर नियतीने हिसकाटली, ह्याच अग्नीमध्ये आपणही राख व्हावं अशा भलत्या सलत्या विचाराने तो भांबावून खचून गेलेला होता. आता कर्ज कसं फिटनार ? माह्या पोरीचं लग्न कसं होणार ? त्याने आपला जीव सोडून घेतला. तो मुक्त झाला. रडत रडत हिरमुसल्यावाणी सुनंदा बोलत होती.
आभाळ गरजत होतं. विजा चमकून चमकून भयभीत करत होत्या. वादळ मात्र शांत झाल होतं. पावसाचे शितोडे रिपरिपत होते. आता मुसळधार पाऊस येणार. आली वेळ तर गारपीठ होणार. या विचाराने घाबरून बाया मानसं गावाकडे वळले होते. नाना आबाजी व त्यांच्या बायकोने सुनंदा - पज्याले सावरले व त्यांना घेवून घराकडे निघाले. अमल्याने वाचलेली गाय व एक गोरं घराकडे हानत घेतले. गाव शिवे जवळ असतांना टपटपत जसा घोड्यांचा कळप आला. तसा कंच्यावाणी पाऊस गारा झरत आल्या. तसेच सारे लोकं धावपळ करत घरी पोहचले.
सुनंदा कपाळावर हात ठेवून हिरमुसून रडत होती नि दारातून त्या झरणाऱ्या गाराकडे पहात होती. पज्या खाटवर बसून रडत होता. अश्रू मनगटाने पुसत होता.
बाहेर विजा लखलखून कडाडत होत्या. वारा आडवा तिडवा पाऊस गाराले घेवून आदळत होता. तसे गाराचे तुकडे चौफेर पसरत होते. नि पज्या वेढ्यासारखा सालं हातातलं पिक पेटलं. खुट्याचे ढोरं जळले. अम्दा कर्ज फिटत होतं. रसिचं लग्न होत होतं. सालं नसिबच आपल गांडू हाये. पाणी आला तरीही रंडनचं हाये. न् नाही आला तरीही रडणचं हाये. तारांच्या खाली कुटार नसतं टाकलं त बर झालं असतं. आता ही आपत्त नसती आली. तरी माय म्हणे, " अरे ! पज्या केताड मेताड सुटलं त कवा थे तारं एकमेकाले टच होइन न् कवा कोलतं पडण हे हातच नाई रे ! म्हणून सांगते त्याच्याखाली कुटार नोको पाडू. इकत घेतलेलं वाया जाईन. पह्यलेच पह्यलच्यावानी कुटार भेटत नाई बरं !" थ्या रोजी मायचं हे आयकलं असतं त आज वादळाने कोलतं पाडून असं वादळ नसतं उठवलं असतं. पश्चाताप करून पुटपुटत ढसाढसा तो रडत होता. नि कुडत्याच्या बाहीनं डोळ्याचं पाणी पुशीत होता. आभाळ गरजत होतं. पाऊस येत होता. तसतसे पज्याचे डोळे वाहत होते.
- आशिष वरघणे
रा. सिरूड पो.वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
पिन. ४४२३०१
मो. ९६३७८१३५०६
प्रतिक्रिया
रडवलस यार..
हृदयद्रावक!
Dr. Ravipal Bharshankar
Dhirajkumar B Taksande
वास्तवता आली लेखणात!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने