Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




शेतकर्‍यांचे साहित्य का नाही? : अमर हबीब

शेतकर्‍यांचे साहित्य का नाही?
               शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणसाला अन्नाची भ्रांत होती. रानावनात भटकायचे. कंदमुळे शोधायची, शिकार करायची आणि भूक भागवायची, यात तो व्यस्त असे. शेतीचा शोध लागला. अन्नाची भ्रांत मिटली. मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले. शेतीच्या शोधामुळे मानव जातीची जगण्याची पद्धत बदलून गेली. रानावनात भटकणारी माणसे वसाहती करू लागली. नवनव्या वस्तू निर्माण होऊ लागल्या. त्यांची एकमेकाशी देवाणघेवाण सुरू झाली. या प्रक्रियेत भाषेचा विकास झाला. त्यातून साहित्य जन्माला आले. अन्नाची भ्रांत मिटल्यानंतरच भाषा, साहित्य, कला आदींच्या विकासाला चालना मिळाली. सर्व कला व साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारे अन्न आहे. त्याला वगळले तर कोणत्याच प्रकारचे साहित्य निर्माण होऊ शकत नाही.

               शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करू शकलात. या विषयी साहित्यिकांनी शेतकर्‍यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही. उलट राबणे त्याचा धर्म आहे व त्याने पिकविलेले फुकट खाणे आमचा अधिकार आहे अशी समजूत करून घेतली. साहित्यिकांनी शेतकर्‍यांशी नाड जोडण्या ऐवजी शेतकर्‍यांना लुटणार्‍या राजा-राजवाड्यात वावरणे पसंत केले. राजे आणि त्यांच्या दरबार्‍यांना रिझविण्यासाठी आपली सारी प्रतिभा खर्ची घातली. संवेदनाशीलतादेखील कशी पक्षपात करते, हे प्रतिभावंतांच्या वर्तनाकडे पाहिले की लक्षात येते.

शेतकर्‍यांचे चित्रण -

साहित्यात शेतकर्‍यांचे जे चित्रण आले आहे, ते ढोबळमानाने तीन गटात विभागता येईल.

१) कृषी जीवनाचे उदात्तीकरण करणारे
२) शेतकर्‍यांचे विदुषकीकरण करणारे व
३) शेतकर्‍यांना खलनायक म्हणून रेखाटणारे.

               कृषी जीवन ही आदर्श संस्कृती आहे. ती सर्वश्रेष्ठ जीवनशैली आहे, असा दावा करून काही लोकांनी ग्रामीण जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रसभरीत निसर्ग वर्णने केली. जोंधळ्याला लटकलेले चांदणे दिसणे काय किंवा हिरवे सपन पाहणे काय सारखेच. शेतकर्‍याचे दुःख या वर्गाला उमगले नाही.

               या वर्गातील साहित्यिकांनी केलेले चित्रण कैद्याने तुरुंगाचे बहारदार वर्णन करावे तसे हास्यास्पद झाले आहे. एखादा कैदी म्हणाला की, ''पहा त्या उंच भिंती, मनोरे आकाशाला भिडणारे.. बलदंड गज आणि साखळदंड गजालाही वाकविता न येणारे... घोर अंधार्‍या खोलीतील एकांत कोण्या साधूला ना मिळे, आमचे जेवण असे, राजाच्याही नशिबी नसणारे.'' आपल्या दुर्दशेला कुरवाळणारे हे साहित्य. बंडाची ठिणगी न पेटवू देणारे. 

               अनिच्छेने शेती करावी लागणे म्हणजे वेठबिगारी. आज बहुसंख्य शेतकरी अनिच्छेने शेती करतात. इलाज नाही म्हणून करतात. आदर्श जीवन शैली वगैरे म्हणून आपण आपली प्रतारणा करीत राहिलो. स्वामीनाथन समितीने ४० टक्के लोक नाईलाजाने शेती करतात, त्यांना संधी मिळाली तर ते लगेच शेती सोडतील. असा निष्कर्ष काढला आहे. कृषी जीवनाचे उदात्तीकरण करून अशा साहित्यिकांनी शेतकर्‍यांना शेतीत नादवून ठेवण्याचे पाप केले आहे. कृषी ही जीवन शैली मानली की, ती परवडते का नाही हे पाहता येत नाही. शेती हा एक व्यवसाय आहे असे मानले तरच ती परवडते का नाही हे पाहता येईल. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित न होऊ देण्यात इतर घटकांसोबत अशा साहित्यिकांनी केले उदात्तीकरण हे जबाबदार आहे असेच मानावे लागेल.

               हिंदुत्ववाद्याने चातुर्वण्य मानला. त्यात शेतकर्‍याला शूद्र मानले. चतुर्वर्णांत शेतकर्‍याचे स्थान ब्राह्मण, वैश्य किंवा क्षत्रिय नाही. मातीशी ज्याचा संबंध येतो ते सगळे शूद्र, या नात्याने शेतकरी शूद्र ठरले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 'शेतकर्‍याचा आसूड' मध्ये या बाबत स्पष्टीकरण केले आहे. शेतकर्‍याला अडाणी समजून अनेक विनोद रचले गेले. अनेक कादंबर्‍यांमध्ये शेतकरी हे एक विनोदी पात्र बनविले आहे. हे सर्व साहित्य शेतकर्‍यांना शूद्र मानणार्‍यांनी लिहिले आहे.

               हिंदुत्ववाद्याने शेतकरी विदूषक रंगविला तसा डाव्या लोकांनी शेतकरी खलनायक रंगविला. गावचा पाटील घोड्यावर बसून रानात जातो व तेथे दिसेल त्या सुंदर स्त्रीवर बलात्कार करतो, अशी वर्णने डाव्या विचारांचा प्रभाव असणार्‍या अनेक लेखकांनी केले आहेत. शेतकरी मालक आहे, कारण सात-बारा त्याच्या नावाने आहे. तो मजुरांचा वर्गशत्रू आहे. अशी डावी विचारसरणी. या विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍यांनी शेतकर्‍याचे चित्र रंगविताना भडकपणे त्याला खलनायक रंगविले.

ग्रामीण साहित्याच्या मर्यादा -

               म. ज्योतिबा फुले, प्रेमचंद, साने गुरुजी, बहिणाबाई आदी काही सन्माननीय अपवाद वगळले तर शेतकर्‍यांचे वास्तव चित्र अभावानेच रेखाटले गेले. सर्वसाधारणपणे शेतकर्‍यांबद्दल मनात आकस ठेवूनच लिखाण झालेले दिसते. याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, पुस्तके कोण वाचतो? कोण विकत घेतो? या प्रश्नांची उत्तरे विचारात घ्यावी लागतील. वाचणारा वर्ग शहरी आहे. बिगर शेतकरी आहे. प्रामुख्याने नोकरदार आहे. त्याला कांदा स्वस्त हवा. कांदा महागला की तो सरकार उलथून टाकतो. त्याला साखर, डाळी वा भाजीपाला महाग झालेला चालत नाही. त्याला स्वतःच्या पगारी वाढवून हव्यात, मात्र शेतकर्‍याला भाव वाढवून मिळालेला चालत नाही. हा मुंबई-पुण्यात राहणारा वर्ग प्रामुख्याने पुस्तके वाचतो. तोच विकत घेतो. त्याला न आवडणार्‍या पुस्तकांना तो हात लावीत नाही. पुस्तके विकणार नसतील तर प्रकाशक ती कशाला छापतील? या वर्गाच्या अभिरुचीला जुळेल असेच लेखन छापले जाते. म्हणून लेखकही तशीच पुस्तके लिहितात. या वाचकांच्या पसंतीला उतरलेले पुस्तक आणि पुस्तकाचा लेखक डोक्यावर घेतला जातो. त्याला पुरस्कार मिळतात. सरकारी कमिट्या मिळतात. नावलौकिक होतो. पैसाही मिळतो. शेतकर्‍यांच्याबद्दल शहरी वाचक वर्गाच्या मनात एक आढी आहे. त्याला नायक करून लेखन केले तर शहरी वाचक त्या पुस्तकाला हात लावत नाही म्हणून जोपर्यंत शेतकरी पुस्तकांचा ग्राहक बनत नाही, तोपर्यंत शेतकरी कधी खलनायक तर कधी विदूषक म्हणूनच चित्रित केला जाईल.

               ग्रामीण साहित्य म्हणून जे काही प्रकाशित झालेले आहे ते शेतकरी कुटुंबात बालपण गेलेल्या व पुढे नोकरी करीत असलेल्या लोकांनी लिहिलेले साहित्य आहे. त्यातही प्राध्यापक शिक्षक अधिक आहेत. शेती सोडून नोकर्‍या करीत असलेल्या लोकांनी शेतकर्‍यांविषयी सहानुभूतीने लिहिलेले हे साहित्य आहे. आज ते शेतकरी नाहीत. दलित साहित्य व ग्रामीण साहित्यात हाच तफावतीचा मुद्दा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस नोकरदार झाला की त्याचे हितसंबंध बदलतात. मात्र दलित माणसाने गाव सोडले, व्यवसाय बदलला तरी त्याची जात बदलत नाही. काल तो ज्या जातीचा होता, तीच जात आजही चिकटलेली असते. शेतकरी कुटुंबातून आलेला प्राध्यापक आणि दलित जातीतून आलेल्या प्राध्यापकांच्या जाणिवांच्या स्तरात फरक पडलेला असतो. जातजाणिवांच्या बदलांचा वेग अत्यंत मंद असतो, आंतरजातीय विवाह केला तर काही पिढ्यांनंतर फरक पडतो. मात्र एका आर्थिकगटातून दुसर्‍या आर्थिक गटात स्थलांतर करणार्‍यांच्या हितसंबधीय जाणिवा मात्र चटकन बदलतात.

शेतकर्‍यांचे साहित्य का नाही?

               आदिवासींचा उठाव झाला की त्याची गाणी होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत, स्त्रीवादी चळवळीलाही गाण्यांची कधी वाण पडली नाही. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकर्‍यांचे गाणे तयार झाले नाही. कधी साने गुरुजींचे 'आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान' हे ७०-७५ वर्षापूर्वी लिहिले गेलेले गाणे गावे लागे. तर कधी नारायण सुर्वे यांचे 'डोंगरी शेत माझं गं, मी बेनू किती, आलं वरीस राबावं, आम्ही मरावं किती?' असे का? शेतकर्‍यांच्या चळवळीचे गाणे का तयार होऊ शकले नाही?

               इराण, अफगाणिस्तानाहून मोगल,पठाण आले, त्यांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. एके काळी ब्राह्मणांनी गाव सोडले, त्यांनीही सुंदर लेखन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'गाव सोडा' आवाहनाला प्रतिसाद देऊन दलितांनी गाव सोडले. १९६० नंतर त्यांच्या लिखाणाला धार चढली. आत्मचरित्रे, नाटके, कविता, कादंबर्‍या या सर्व क्षेत्रात दलित साहित्याने आपले वेगळेपण ठसविले. बलुतेदार बाहेर पडले, त्यांनीही विपुल लेखन केले. या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट सिद्ध होते की, जे स्थलांतर करतात त्यांचे साहित्य तयार होते. त्यांच्यातील प्रतिभावंतांना अनुकूलता मिळते व ते लिखाण करू लागतात. आपल्याकडे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये सांस्कृतिक जाणिवा अधिक प्रगल्भ असलेल्या दिसतात, त्याचे कारणही तेच आहे. त्या माहेर मधून सासरी स्थलांतर करतात. शेतकर्‍यांना स्थलांतर करता येत नाही. ते जमिनीशी बांधले गेलेले आहेत. गावात जन्मायचे, गावात जगायचे आणि गावातच मरायचे असा त्यांचा जीवनक्रम. लेखनासाठी 'परक्या प्रवेशा'ची क्षमता महत्त्वाची मानली जाते. स्थलांतर केलेल्यांना ही अनुभूती मिळते. ते अधिक सुलभपणे 'परक्या प्रवेश' करू शकतात. शेतकर्‍याला जमीन, गुरे आदी कामांमुळे स्थलांतर करता आले नाही म्हणून शेतकरी आंदोलनात शेतकर्‍यांनी लिहिलेले साहित्य तयार होऊ शकले नाही. 

               कुटुंब, जात, गाव, देश हे समाजशास्त्रीय कोश आहेत. या प्रत्येक कोषाला स्वतःची अशी जाणीव आहे. या कोषातून बाहेर पडणार्‍यांना सृजनाचे वातावरण मिळते. कोषांतर करणारे समूह सांस्कृतिक पातळीवर तुलनेने अधिक सक्रिय दिसतात. शेतकर्‍याला हे वातावरण मिळत नाही. म्हणून शेतकर्‍यांचे साहित्य निर्माण झालेले नाही. असे म्हणता येईल.

               प्रगत देशांकडे पाहिले तर असे लक्षात येते की, त्या देशांत शेतीवर जगणारे लोक खूप कमी आहेत. काही देशांत तर शेती करावी म्हणून प्रोत्साहन दिले जाते. त्या देशांमध्ये बिगरशेतकरी लोक काही काळासाठी शेती करतात. आपल्या देशात शेतीवर जगणार्‍यांची संख्या एके काळी ९० टक्के होती. अलीकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले असले तरी अजूनही ६०-७० टक्के लोक शेतीवर जगतात. ९० च्या नंतर स्थलांतराला वेग आला आहे. शेतकरी (यात मजूरही आले) शहराकडे धाव घेत आहेत. शेतीवरचा भार कधी ना कधी कमी होणारच आहे. चार भावांपैकी तीन भाऊ इतर क्षेत्रात जातील. एक भाऊ तेवढा शेती करेल. ७५ टक्के लोक शेतीच्या बाहेर पडणार आहेत. त्या काळात खेड्याचे रूप पार पालटून गेलेले असणार आहे. ग्रामीण साहित्याला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्या वेळेस बिगरशेती क्षेत्राचा कोश भेदून स्वेच्छेने लोक शेतीच्या कोषात येतील तेव्हा खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचे साहित्य तयार होऊ शकेल. 

                ९० च्या नंतर नवे तंत्रज्ञान आले. या तंत्रज्ञानाने सारे जग बदलून जात आहे. एकदम नवी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतीचा शोध लागला तेव्हा मानवी जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळाली होती. आता नव्या तंत्रज्ञानामुळे पुन्हा एकदा जग बदलांच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकले आहे. या नव्या जगाचे प्रश्न नेमके कसे राहतील? हे सांगता येणार नाही परंतु ते आजच्या सारखे असणार नाही हे निश्चित. हा संक्रमण काळ टिपण्याचा जो जोरकस प्रयत्न व्हायला हवा तेवढा होताना दिसत नाही. काही ताकदीचे लेखक समोर येत आहेत. ९०च्या आधीच्या लिखाणाच्या तुलनेत मराठी ग्रामीण लेखक नवे लिहिण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ही आशादायक आणि दिलाशाची बाब आहे.

- अमर हबीब
अंबर, हाउसिंग सोसायटी,
अंबाजोगाई- ४३१५१७ (जि.बीड)
Mob : 9422931986
Email : habib.amar@gmail.com

Share