कळलंच नाही
भविष्याच्या आशेने वळून गतकाळी पाहिलचं नाही..
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही...।।
पारावरच्या गप्पा, चौकातली भांडणं
पारंब्यावर झुलणं, भर उन्हात हिंडणं
पक्षांची किलबिल, नदी चा पूर
शाळेची घंटा, देवळातला सूर
आठवणीतलं बालपण हरवलं कधी कळलंच नाही...
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही... ।।
डोईवरचा पदर खांद्यावर आला
आईबाबाचा आता मम्मीपप्पा झाला
कुंकवाच्या जागी टिकली आली
जिन्स घालून गावभर फिरते बाली
लयाला गेलं माणूसपण कधी कळलंच नाही..
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही...।।
एफबी इंस्टा व्हॉटसएपवर ना प्रेमाची कमी
दोन दिवसाच्या ओळखीत पळू लागले प्रेमी
5G च्या स्पीडने आता जग बदलू लागले
मायबापाचे प्रेम पोरांना खोटे वाटू लागले
भाषा बदलली प्रेमाची कधी कळलंच नाही..
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही...।।
चॅट मध्ये बोलून नाती जोडली गेली
रक्ताच्या नात्याची कदर ना केली
स्टेट्स, स्टोरी, स्नॅपचे सुटेना कोडं
मोबाईल शिवाय आता करमेना थोडं
झालो गुलाम तंत्रज्ञानाचा कधी कळलंच नाही..
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही...।।
- निलेश दिगंबर तुरके
मु आटमुर्डी त राळेगाव जी यवतमाळ
7741877174
