कविता :
बळीराजाचा आक्रोष
कपाळावरी घाम घेऊन, राबतो शेतकरी,
तरी उपाशी पोट घेऊन, झोपतो हा शेतकरी...
पेरतो स्वप्ने मुठीने, काळ्या मातीच्या उरी,
आभाळाच्या दारात, याचना करतो हा शेतकरी...
कधी पाऊस रुसतो, कधी पूर येतो घरी,
नशिबाच्या फटकाऱ्यांनी, झिजतो हा शेतकरी...
बियाण्यांच्या किमती वाढे, खत मिळेना वेळेवरी,
हिशेबांच्या चक्रव्यूहात, फसतो हा शेतकरी...
सावकाराच्या वहीमध्ये, आयुष्याची नोंद सारी,
व्याजाच्या त्या आकड्यांनी, दबतो हा शेतकरी...
माल पिकवून बाजारात, भाव मिळेना पदरी,
कष्ट विकूनही रित्या, हाताने परते हा शेतकरी...
लेकरांच्या शिक्षणाची, स्वप्ने ठेवून अंतरी,
स्वतःच्या इच्छा गाडून, जगतो हा शेतकरी...
चुलीवरती भाकरी नाही, डोळ्यांमध्ये चिंता सारी,
पोटच्या त्या लेकरांसाठी, हसतो हा शेतकरी...
नेत्यांच्या भाषणामधुनी, आश्वासनांची बरसात,
प्रत्यक्षात मात्र त्याच्या, वाट्याला अंधारी रात..
जग जगवणाऱ्या हातांना, जगण्याचीच मारामार,
अन्नदात्याच्या वाट्याला, का उपेक्षेचा संसार.?
मातीशी नाते जपताना, रक्त आटवतो हा शेतकरी,
देशाच्या समृद्धीसाठी, दुःख पचवतो हा शेतकरी...
कधीतरी या देशानेही, त्याची वेदना जाणावी,
घामाच्या प्रत्येक थेंबाला, योग्य किंमत मिळावी...
नको दयेची भीक आता, नको खोटा सन्मान,
कष्टकऱ्याच्या हातामध्ये, हवा जगण्याचा मान.!
ज्याच्या घामाच्या थेंबांनी, ताट सजते देशाचे,
त्याच्याच घरात अंधार, हे दुर्दैव कोणाचे.?
जगाच्या भुकेचा प्रश्न जो, स्वतः उपाशीराहून सोडवतो,
त्याच्या वेदनेचा आवाज, कोण ऐकतो? कोण ऐकतो?
कवी - डॉ ज्ञानेश भाऊरावजी वाघमारे
यादगार व्यायाम शाळेजवळ, शास्त्री वॉर्ड,
हिंगणघाट, जि. वर्धा
पिन - ४४२३०१
भ्रमणध्वनी - ९०२१५११९८४
