कथा
हरवलेला पान्हा
"येई हो विठ्ठले, माझे माऊली ये।
निढळावरी कर, ठेवूनी वाट मी पाहे।".....
सायंकाळची आरती करीत असतांना कार्तिकचे डोळे नेहमीप्रमाणे भरून आले. त्याच्या मनात चाललेल्या द्वंद्वाला या जगात कुठेच, कुणाकडेच उत्तर नव्हते, म्हणून कदाचित विठू माऊली पुढे आपले गार्हाणे मांडण्याचा प्रयत्न करीत असावा. हे जगतनियंत्या, तू पुरुष अवतार असूनही माऊली झालास, भक्तांची आई झालास, तू तुझी भूमिका पार पडण्यास समर्थ आहेस पण मी तर एक सामान्य, अतिसामान्य पुरुष, माऊलीची भूमिका कशी पार पाडू? या तान्ह्या कोकराला सांभाळणे इतके सोपे का आहेत? कुठून आणू माऊलीच्या कुशीची उब? कुठून आणू सुकलेल्या ओठांसाठी माऊलीचा पान्हा?... कुठून आणू?.. देवा कुठून आणू?...
मनातल्या मनात विठ्ठलाशी भांडणारा कार्तिक अगतिका सारखा रडू लागला. देवा पुढे जोडलेले दोन्ही हात अश्रूंनी ओले झाले. त्या जोडलेल्या हातांवर डोके टेकून तो हुंदके देऊ लागला. भानावर आला तो बाळाच्या रडण्याच्या आवाजाने. तसाच तो पाळण्याच्या दिशेने घाईघाईने गेला. त्याने बाळाला पाळण्यातून बाहेर काढले. उबेतून निघालेलं तान्हुलं शरीर, बाहेरच्या वाऱ्याच्या झुळकीने शहारलं. त्याच्या रडण्यात खंड पडला. जरा त्रासिक भाव चेहऱ्यावर उमटू लागले, मग इवल्याशा शरीराला आळोखे-पिळोखे देत एक मोठी जांभई दिली. त्याचा चेहरा लाल बुंद झाला. हाताच्या कुशीत पुन्हा दडू लागला. ओठांनी, हाताने जागा चाचपडू लागला. कार्तिकला सवयीने लक्षात आले की बाळाला भूक लागली आहे. त्याला छातीशी कुरवाळत किचन कडे गेला. दुधाची बाटली सरळ करून त्यात दूध ओतले, तोपर्यंत तान्हुल्याचे रडणे पुन्हा चालू झाले होते, ते कासावीस होत रडत रडत आजूबाजूला कुस शोधत, चाचपडत होते. घाईतच खिडकी जवळील सोफ्यावर बसत कार्तिकने त्याच्या ओठाला बाटली लावली. आतुरतेने निप्पल चोखतचोखत बाळाचे रडणे थांबले होते. कार्तिकने एक दीर्घ उसासा टाकला. बाळ रडायला लागलं की त्याला अस्वस्थ वाटायचं. मोठ्ठ संकट ओढवल्यासारखं वाटायचं. त्याला चूप करता करता कार्तिकची तारांबळ उडत होती. वर दुधावर असल्यामुळे पोटाचा घेर ताठर होऊन तृप्तीने एक एक तास खेळणाऱ्या बाळासारखं सुख त्याच्या नशिबी कुठलं? भुकेने कासावीस जीव झाला की भूकमोड होईपर्यंत प्यायचं आणि सोडून द्यायचं. पुन्हा काही वेळ चिडचिड, हे सत्र सतत सुरू असायचं.
एका जिवातून निर्माण होणारा दुसरा जीव आकार घेत असताना सोबतच भावनिक ओढ सुद्धा निसर्गतः निर्माण होते. ती उब, आईचा स्पर्श सगळं कळतं त्याला जन्मासोबतच. ती जाण निर्माण होते त्या जिवात. 'या हृदयीचे त्या हृदयी' हा नैसर्गिक तारसंदेश आपोआप कळतो मायलेकांना. बाळाला भूक लागली की आईची छाती दाटून येते. शेवटी तिच्यातून निर्माण झालेला हाडा मासाचा गोळा असतो. त्या एकमेकांना एकमेकांचा हुंकार आपोआप कळतो. दुसऱ्या कोणी कितीही जीव लावला तरी आईच्या स्पर्शाची आणि आईच्या दुधाची बरोबरी नाही करू शकत, मग तो त्याचा अंश असणारा बापाचा स्पर्श असला तरी....
पोटात चार थेंब दुधाचे जाऊन बाळाचे रडणे थांबले होते, पण समाधानाचं स्मित काही केल्या त्याच्या चर्येवर उमटायला तयार नाही. जरा मुसमुसतच त्याने हातपाय हलवायला सुरुवात केली.
कार्तिक ने बाजूला तालगी टाकून त्यावर त्याला टाकले. खुळखुळ्याचा आवाज करून त्याला खेळवण्याचा प्रयत्न करू लागला. ईवलासा निरागस जीव, त्या खेळण्यासोबत हात पाय वर करून खेळू लागला. कार्तिकला मात्र भूतकाळ आठवू लागला.
कार्तिक आणि कांचन दोघेही एकमेकास अनुरूप असं हे जोडपं गुण्यागोविंदांनं नांदू लागलं. देखणी, गोरीपान, चुणचुणीत. कांचन कार्तिकची खूप काळजी घ्यायची. त्याला हवं - नकोची नियमावली तिला तोंडपाठ होती. तोही तिच्यासाठी जीव ओवाळून टाकायचा. सहचर्याच नातं कसोशीनं जपत होता.
"अहो उठाना! दुकानात नाही का जायचं ?"
"हो.. गं" म्हणत त्यांना तिला जवळ ओढलं.
"कार्तिक.. हे काय, सकाळी सकाळी, उठा आता"
एक लाजरं, प्रणयात ओथंबलेलं, हास्य ओठावर घेऊन कांचन कार्तिक पासून दूर झाली. डोळ्यांनी पापणी अर्धवट उघडत कार्तिकने अनिच्छेनेच तिचा हात सोडला. त्याचा हा अवघडपणा तिला आवडायचा. तिच्यावरील प्रेमाचा तो पुरावा होता. खोलीत पसरलेल्या मंद प्रकाशात तिला कार्तिकचा चेहरा प्रसन्न आणि तृप्त वाटला. या प्रमाणे ओथंबलेल्या संसारात ती नित्य न्हात होती. खिडकीतून येणारी कोवळी किरणं खोलीत येण्यासाठी मोकळी करत तिने खिडकीचे पट उघडले. त्यासोबत येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळकीने ती शहारली. क्षणभर डोळे मिटून हा पहाट वारा पित ती तशीच थबकली. पुढल्या क्षणी दोन्ही हात जोडून, नुकत्याच पृथ्वीवर पाऊल टाकणाऱ्या सुर्यनारायणाला श्रद्धेने नमस्कार केला आणि मनोमन धन्यवाद मानले, तिला मिळालेल्या या कुबेराच्या खजिन्यासाठी."हे सुख समाधानाच वैभव असचं दारात राहू दे. तुझ्या पहाट किरणांनी ते दिवसा गणित वृद्धिंगत होऊ दे". अशीच मनोकामना तिने या दिनकराकडे मागितली आणि आपल्या नित्यक्रमात मग्न झाली.
कांचनचं पूर्व आयुष्य हेही असंच कोवळ्या किरणांसारखं. सुखाचं, समाधानाचं, आनंदाचे वैभव झालेलं. एक सर्वसामान्य कुटुंब पण सालस, चाकोरीबद्ध, शिस्तबद्ध, सरळमार्गी माहेर लाभलेली कांचन. सासरही तसंच. कार्तिक सारखा सुविद्य, सालस, सोज्वळ नवऱ्याची बायको झाली. एक नणंद. जी लग्न होऊन आपल्या सुखी संसारात मग्न होती. सासू-सासर्यांचे छत लग्नाआधीच नियतीने हिरावून घेतलं त्यामुळे राजाराणी दोघांचा संसार त्यांनी सजवायचा, त्यांनी सावरायचा,आणि त्यांनी सांभाळायचा. कांचनच्या लाघवी, मनमिळावू स्वभावमुळे शेजाऱ्या- पाजार्याशी अति जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. सुदैवाने शेजारीपाजारीही प्रेमळ आणि सुस्वभावी लाभणे हे दैवच. कधी कधी आपण कितीही हात देण्याचा प्रयत्न केला तरी पुढची व्यक्ती त्याला हात देईलच असे नसते.मुलीला सासर चांगलं मिळणं जेवढं सुदैव, तेवढेचं शेजारी चांगले मिळणे सुदैवाचाच भाग असतो. कारण म्हणतात ना, 'सख्खे शेजारी असले तर भवताल सुदृढ असतो आणि सावत्र शेजारी असले तर भवताल अशुद्ध होतो'. कांचनने याबाबतीतही भाग्य काढले होते. कार्तिक आई बाबांच्या मर्जीतला, परंपरा जपणारा, मानपान, लहान, मोठ्यांचा आदर राखणारा, नेहमी कुणाच्याही मदतीला तत्पर असणारा त्याच्या या स्वभावामुळे आई-बाबा गेल्यानंतरही जाणवणारे एकटेपण जणू आजूबाजूच्या गोतावळ्यामुळे जरा भरून निघत होते. आनंदाच्या सरोवरात विहार करणाऱ्या राजहंसाच्या जोडीचा संसार चार वर्षाचा प्रवास पार करून चुकला होता. कार्तिकचा व्यवसाय होता त्यामुळे तो दिवसभर दुकानात असायचा. कांचन उच्चशिक्षित असली तरी नोकरी नसल्याने घरीच असायची, त्यामुळे घरची आवराआवर झाली की दुपारचा रिकामा वेळ घालविण्यासाठी शेजारीपाजारी बसउठ होणे हा तिचा दिनक्रम. मध्यम वयाच्या सरला काकूंच नेहमीच तिच्याकडे उठणं बसणं असायचं. आजही त्या संध्याकाळच्या जेवणाची तजवीज म्हणून चवळीच्या शेंगा मोडायला घेऊन आल्या कांचन कडे.मोकळ्या बाल्कनीत बसलं की अजून एक, दोन मैत्रिणी येऊन बसायच्या मात्र आज या दोघीचं.इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या आणि सरला काकू म्हणाल्या,
"कांचन एक विचारू?",
"काय ?विचाराना!",
"नाही म्हणजे, आता तुमच्या लग्नाला चार वर्ष होत आले असतील, नाही का?",
"हो काकू. पुढल्या महिन्यात चार पूर्ण होणार". सहजीवनाच्या तृप्तीचं, समाधानी स्मित ओठावर खेळवत कांचन बोलली.
"अगं मग किती वर्ष प्लॅनिंग आहे तुमचं?"
"म्हणजे?" कांचनला प्रश्नाचा अर्थ न कळल्याने अगदी निरागसपणे ती बोलली.
"अगं.. एव्हाना घरात पाळणा हलायला हवा होता. नाही म्हणजे, तुझ्याविषयी जिव्हाळा वाटतो म्हणून सहज विचारलं. आजकाल तुम्ही तरुण मुलं मुली, जबाबदारी नको म्हणून निसर्गाला बाधा देता आणि मग निसर्ग पाठ फिरवतो म्हणून आपलं विचारलं", काकूच्या खुलासेवर बोलण्याने कांचन जरा ओशाळली. स्वाभाविक लाजरे पण डोळ्याच्या पापण्यांवर स्वार झालं. नजर खाली, जमिनीकडे वळवत बोलली, "तसं काही नाही काकू, पण वेळच आली नाही आणि आम्ही कधी असा गंभीरपणे विचारही केला नाही त्या विषयावर",
"अगं मग कर की! जरा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही आजकालच्या मुलांचं हेच मला कळत नाही, किती निष्काळजीपणा हा... अगं आजकाल विज्ञानामूळे बरेच उपाय आहेत. पटकन उपाय मिळतात. आमच्या वेळी तर वर्षाच्या आत चाहुल नाही लागली, तर माहेरचा उद्धार व्हायचा", हसत हसत सरला काकूंनी कांचनच्या मनात मातृत्वाच्या भावनेला जागवले होते. हसतं खेळतं चार वर्ष कसे निघून गेले ह्या दोघांनाही कळले नाही. आई-बाबा होण्याची नैसर्गिक इच्छा दोघांच्याही मनात असली तरी 'होईल आज ना उद्या'असेच त्यांना वाटायचे. कधीही त्या विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली नाही. रात्री कार्तिकच्या कुशीत शिरत कांचनने हळूच दुपारचा विषय काढला. "कार्तिकही तेवढ्याच निरागसपणे बोलला, "अगं त्यात काय विचार करण्यासारखे? तू कशाला काळजी करते",
ते काही नाही. आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊ",
"बर.. ठीक आहे, काही हरकत नाही, जाऊया".
सरला काकूंनी कांचनच्या मनात पेरलेलं वात्सल्याचं रोप आता तिच्या कुशीत दिवसागणीत वाढत होतं.मातृत्वाच्या उर्मीने तिचा उर ओथंबत होता. दोघांच्याही डोळ्यातं स्वप्न... बाळाच्या दुडू दुडू धावणाऱ्या पावलांचे चित्र आणि कानात बोबड्या बोलांचे येणारे ध्वनी... ह्या गोड, गोजिरवाण्या स्वप्नांच्या देखरेखीत दोघेही गुंतले. कांचनचे डोहाळे पुरवण्यात कार्तिक हरखुन जात होता. प्रेमाच्या धाग्याने बांधलेले सख्खे शेजारी कांचन ला जपण्यात कुठलीही कसूर ठेवत नव्हते.
"वहिनी.. हळू चला", "ए पोरी... असू दे, दे ती पिशवी ईकडे, मीच आणते तुझा भाजीपाला. तू आराम कर", "कांचन तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा केलाय. घे खाऊन, गरम गरम.काही खावसं वाटलं तर सांग पोरी", अशा प्रेमळ वर्तुळात कांचन अतिशय सुरक्षित होती. तिचं कोणी काळजी घेणारं नाही अशी उणीव कधी भासलीचं नाही. माहेर हे गावापासून दूर. आई संधिवाताने जर्जर. वहिनीला तिच्या सेवेत राहावे लागायचे त्यामुळे माहेरचे सल्ले फक्त फोनवरचं मिळायचे. तसेही आनंदाच्या झुल्यावर झुलणाऱ्या कांचनला, प्रकृतीची कुठलीच तक्रार नसल्याने चोविस तास कोणी जवळ नसल्याची उणीव भासत नव्हती.
गाव विस्ताराने बरे असले तरी तालुक्याचे गाव जवळ असल्याने वैद्यकीय सुविधा ह्या बेताच्याचं, त्यामुळे तालुक्याच्या गावीच कांचन चे उपचार चालू होते. आठ महिने बघताबघता संपले आता पावलं जड होवू लागली होती. वावरताना शरीरात शिथिलता जाणवू लागली होती. बाळाच्या आंतरिक हालचाली बळावल्या होत्या. पोटाचा घेर वधारू लागला. आता मात्र दिवस लवकर संपावे असे तिला वाटत होते. केव्हा केव्हा हे दिवस संपतील आणि एक गोंडस निरागस स्वप्न, साकार होऊन आपल्या कुशीत विसावे, त्याच्या बाललीलांनी आपला भोवताल दुमदुमून निघेल ही आतुरता आता शिग गाठू पाहत होती.
"अहो.. काय असेल मुलगा, की मुलगी?",
"काही का असेना, आपलंच रूप",
"तसं नाही हो.. पण आपलं एक अंदाज, बर मुलगा झाला तर नाव काय नाव ठेवायचे, आणि मुलगी झाली तर काय ठेवाल ते तरी सांगा".
असला कुठलाही विचार न केलेला कार्तिक नेहमीप्रमाणे मिस्कीलपणे म्हणाला, "मुलगी झाली तर अंजली आणि मुलगा झाला तर राहुल", त्याचा मिस्कीलपणा लक्षात येऊन कांचन लटकेच रागावली.
"सरळ सरळ शाहरुख खान आणि काजोल म्हणाना. मी एवढी गंभीरपणे विचारते आणि तुमची आपली मस्करी".असा हा त्यांचा प्रेमळ संवाद दोघांनाही निद्रा राणीच्या स्वाधीन करत चांदण्यांमध्ये विरून जायचा.
आता तिला जास्तच अस्वस्थ वाटत होते. शरीर जडावलं होतं. काही खाण्याची इच्छा होत नव्हती. पोटात अधून मधून दुखून येत होतं.तिने कार्तिकला फोन लावला, "अहो.. तुम्ही येता का घरी?", "का बरं? काय झालं?",
"काही नाही, पण मला घाबरल्यासारखं होतंय, पोटातही दुखतंय जरा जरा. खूप अस्वस्थ वाटतय".
"बरंबरं.. तू काळजी करू नको, मी हा आलोच, तोवर कोणालातरी बोलावून घे घरी. सरला काकूंनाच बोलाव, बरं पडेल", "बरं...", म्हणून फोन ठेवला. इच्छा नसताना उठून दार उघडले. तेथूनच सरला काकूंना आवाज दिला. काकूंना आवाजाची चाहूल लागताच त्या आल्या, का गं? काय म्हणत होती".
"काही नाही काकू, जरा वेळ बसता का माझ्याजवळ? मला कसंसच होतय".तिची उतरलेली चर्या पाहून अनुभवी डोळ्यांनी काय ते ताडलं. त्यांची नजर तिच्या पोटाकडे गेली ते ओटी पोटाकडे घसरल्याचे त्यांना लक्षात आले.
"तुला पोटात कळा येतात का?", तिला हाताला धरून बसवत काकूंनी विचारलं. "माहित नाही, पण थोडं थोडं दुखतंय विशेष काही नाही.हे येत आहेत तोवर बसा म्हटलं",
"बरं कार्तिकला फोन लावते का?",
"अहो... काकू कशाला काळजी करता? हे येतच आहे थोड्या वेळात, अगं मला बोलायचंय, लाव तर फोन", "बरं", म्हणत तिने फोन डायल केला.
"मी काकू बोलते, कार्तिक मी काय म्हणते तू चार चाकीची व्यवस्था कर मला वाटतं दवाखान्यात न्यावं लागेल तिला".
"काकू, सगळं ठीक आहे ना?",
"हो रे.. काही काळजी करण्यासारखं नाही. मला वाटतं दवाखान्यात नेण्याची वेळ आलेली आहे. आधीच गेलेले बरे. परत कळा आल्यावर उगाच तारांबळ उडायची. तशी ठीक आहे ती".हसतच काकूंनी फोन ठेवला आणि घरात जाऊन दवाखान्यात नेण्याच्या सामानाची जुळवाजवळ करू लागल्या.
"काकू, तुम्ही चला ना सोबत, मला भीती वाटते",
"हो गं, मला माहिती आहे मला यावचं लागेल".
"योग्य वेळी आलात तुम्ही", डॉक्टर बोलले, "आज चार सिजर आहेत! जरा बिझी आहे शेड्युल पण.. ठीक आहे, आजच सिजर करावं लागेल",
"ठीक आहे डॉक्टर साहेब". काळजीच्या स्वरात कार्तिक उत्तरला.
वर्हांड्यात फेर्या मारणार्या कार्तिकला प्रत्येक क्षण दिवसासारखा भासत होता. "काय होईल, नीट होईल ना!, होईलच!! आपलं बाळ काही वेळात आपल्या हातात असेल, हो, नक्कीच ...!" काळजी आणि आनंदाच्या संमिश्र भावना मनात उफाळून येत होत्या. तेवढ्यात आतून नर्सने निरोप आणला,
"तुम्हाला मुलगा झाला. बाळ बाळंतीण सुखरूप आहेत". कार्तिकला पहिलं वाक्य कळण्याच्या अगोदर दुसरं वाक्य काळजापर्यंत गेलं. तो मनातून सुखावला. नकळत हात जोडले गेले. आकाशाकडे पाहात त्याने धन्यवाद दिले.
"चौथ्या दिवशी सुट्टी होईल. काळजीचे काही कारण नाही. स्वस्थ आहेत दोघेही", डॉक्टर साहेबांच्या या बोलण्याने त्याच्या सर्व चिंता कुठल्या कुठे पळून गेल्या. आता केव्हाकेव्हा त्या दोघांना डोळे भरून पाहतो असं झालं होतं. काकूचा हात हातात घेत त्याने आनंद व्यक्त केला आणि डोळ्यांनीच काकूंचे धन्यवाद मानले. दुसऱ्या दिवशी कार्तिक दवाखान्यात आला. त्याला डॉक्टर साहेबांच्या कॅबिन कडे बोलावले,
"आपण उद्या डिस्चार्ज देतोय पेशंटला".
"तुम्ही तर चौथ्या दिवशी म्हणाला होतात ना!",
हो.. पण सिजर नॉर्मल आहे, उद्या जाऊ शकता घरी. सर्व फॉर्मॅलिटीज आजच पूर्ण करून घ्या. ओके..", कार्तिकला जरा खटकलं पण जाऊ द्या, बाळाला लवकर घरी नेण्याचे समाधान अधिक होते.
बाळबाळंतीणीचं सख्ख्या शेजाऱ्यांनी उत्साहात स्वागत केलं. उद्याची रंगीत, गोजिरे स्वप्न हातात घेऊन दोघांनीही गृहप्रवेश केला. सरला काकूंनी आईची भूमिका पार पाडत, सर्व मदत केली. बघताबघता पंधरा दिवस निघून गेले. सानुल्याच्या रडण्याने घर दुमदुमू लागले.पण कांचनचं सुरुवातीला साध वाटणारं पोटाचं दुखणं हळूहळू वाढू लागलं होतं. सुरुवातीला वाटलं कमी होईल पण ते कमी न होता वाढूच लागलं होतं. आज तर तिला अंगात तापही वाटत होता. कार्तिक लगेच तिला त्याच नर्सिंग होम मध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि तिला जिल्ह्याच्या दवाखान्यात न्यायचा सल्ला दिला. कार्तिकला आश्चर्य वाटलं.
"काय झालं डॉक्टर साहेब? आतापर्यंत तर बरी होती", "हो पण नक्की कारण कळलं नाही. आपल्याकडे काही मशिनरीज नाहीत तेव्हा त्यांना जिल्ह्याला हलवावं लागेल, माझीच ॲम्बुलन्स घेऊन जा हरकत नाही. पेमेंट करायची गरज नाही", कार्तिक तिला घेऊन जिल्ह्याला गेला. आता तिची तब्येत दिवसागणित खालावतं चालली होती. त्याला काहीच कळत नव्हतं. सरला काकूचा एक भक्कम आसरा होता. आनंदाच्या दुधात कोणी मिठाचा खडा टाकावा असे झाले होते. हे अचानक काय उद्भवले काहीच कळत नव्हते. कांचनला जिल्ह्यात दाखल करून चार दिवस झाले. तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. कार्तिक पुढे तारांगण तरळल.त्याला काय करावं, काय बोलावं काहीच कळत नव्हतं. या डॉक्टरांकडून त्या डॉक्टरकडे येरझारा घालण्यातच दिवस अपुरा पडत होता डॉक्टर फक्त टेस्टवर टेस्ट करीत होते. कार्तिक ची मति सुन्न झाली. बघता बघता पाचवा दिवस उजाडला डॉक्टरांनी कार्तिकला अतिदक्षता विभागाकडे बोलावून घेतले, "शी इज नो मोअर",
"काय..?????", कार्तिकच्या डोळ्यासमोर काजवे तरळले.कानठळ्या बसवणाऱ्या असंख्य घंटांचा नाद होऊन कान सून्न व्हावे, तसे कार्तिकला पुढले काहीच ऐकू आले नाही. तो विस्फारलेल्या डोळ्याने फक्त बघत होता. त्याच्या दंडाला धरून डॉक्टरांनी हलवत भानावर आणलं, "सर, सांभाळा स्वतःला, आम्ही प्रयत्न केले पण केस इतकी क्रिटिकल होती की आमच्या हातीही काहीच नव्हते. उद्या पोस्टमार्टम होईल",कार्तिक दवाखान्याच्या वर्हांड्यात आला जणू त्याचे ओझे त्याचे पाय ओढत आणतायेत. माहेर, सासर, जवळचे ,दूरचे नातेवाईक दवाखान्यात गोळा झाले होते. कार्तिकच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता, तो तसाच गुडघ्यांवर बसला. त्याच्याही नकळत त्याच्या तोंडून किंचाळी निघाली, "कांचन......." ती आसमंत भेदणारी आरोळी, काय घडलं नेमकं, ते सर्व जमावाला सांगून गेली...
सुखाच्या चांदण्यात मढलेल्या घरावर, अमावस्येची काजळी पसरली होती. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. विश्वासानं, मायेनं, प्रेमानं त्याच्या बाहुत विसावणारं पाखरू अनंतात उडून गेलं होतं, उद्याच्या रंगीत स्वप्नांचे तारांगण विणणारे हात... त्याच हाताने भंगलेल्या संसाराची राख वेचत होता....
कार्तिकच्या हातात पोस्टमाॅर्टमचा रिपोर्ट पडला. त्याने अनिच्छेनेच तो वाचायला घेतला.त्यातील खुलासा वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ही काळाने घातलेली झडप नव्हती तर. दुसऱ्याच्या चुकीचे भोग होते. ही दैवलिखित घटना नव्हती तर दुर्लक्षपणाचा बळी होता. त्याला आत्ता कळले, तालुक्याला भरती करण्यासाठी डॉक्टरांनी इतकी उदारता का दाखवली. व्यवसायिकांच्या मनात कुठून जिव्हाळा निर्माण झाला. तो, डॉक्टरांचा माणूसपणा नाही तर स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्याचा निष्फळ प्रयत्न होता.रिपोर्ट मध्ये लिहिले होते, 'शस्त्रक्रियेच्या दरम्यान गर्भात झालेल्या जखमेमुळे अतिरक्तस्त्राव होऊन हा मृत्यू झाला होता'.कार्तिकला कुठला पवित्रा घ्यावा काहीच कळेना. कुणाच्या दुसऱ्याच्या निष्काळजीपणाची किंमत कांचनला मृत्युच्या रूपात भरावी लागली होती. त्या डॉक्टरांवर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवतो, त्यांना आपण देव मानतो, ज्याच्या दारात आपण वेदना दूर करण्यासाठी याचना करतो त्यानेच आज मृत्यूचे दान पदरात टाकले होते. इतके अक्षम्य दुर्लक्ष कसं करू शकतात? ही चूक नाही, गुन्हा आहे. मी चूप बसणार नाही पोलिसात तक्रार करून त्या दवाखान्याला सील लावल्याशिवाय चूप बसणार नाही.एखाद्याच्या जीवाशी कसा खेळ करू शकतात. त्यांचा आकांत पाहवेना. सर्व नातेवाईक त्याचं सांत्वन करीत होते. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते पण मनाच्या भूमीतील झालेली उलथापालथ त्याला शांत होऊ देत नव्हती. दुसऱ्याच्या गुन्ह्याची शिक्षा का भोगावी माझ्या कांचनने? तिच्याशीचं का व्हावी ही दुर्घटना? कोणताच रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. कार्तिक सोबत आक्रंदत होता घराचा कोपरानकोपरा....बऱ्याच रृदनानंतर कार्तिक शांत झाला त्याचं दुसरं मन म्हणू लागलं ,"जरी दुसऱ्याच्या चुकीमुळे आपला संसार उध्वस्त झाला असला तरी तीही आपल्यासारखी माणसंच. चुक ही शेवटी माणसाच्या हातूनच होते, फक्त या चुकीच्या वेळी आपण सापडलो हे आपले दुर्दैव. तसंही आता आपली कांचन कधीही न परत येण्याच्या वाटेवर निघून गेलेली आहे. काहीही केलं तरी ती परत येणार नाही. आपण सामान्य माणसं कितीही उठाठेव केली तरी पैशासमोर आपण टिकाव धरणार नाही मग कागदांच्या भरोशावर कुठवर भांडणार?ती निघून गेली पण बाळ आपल्या ओंजळीत टाकून गेली आता त्याला जपणं हे आपलं पहिलं ध्येय असावं. चार दिवस सर्व राहतील आणि निघून जातील आपापल्या घरी, मग आपण आणि आपलं बाळ दोघेच असू एकमेकांसाठी... कांचनच्या आठवणींच्या सोबत....'
बाळाच्या आवाजाने कार्तिक भानावर आला. त्याला छातीशी कुरवाळत साश्रू डोळ्यांनी बोलून गेला, "कुणाची तरी एक चूक तुला तुझ्या आई पासून दुरावून गेले रे बाळा,हरवला गेला रे तुझा हक्काचा पान्हा...."
मंजूषा काऊटकर.

प्रतिसाद (1)
धन्यवाद
Manjusha sanja…
धन्यवाद