![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अविस्मरणीय संमेलन सोहळा
कोल्हापूर जिल्हयातील शिरोळा तालुक्यातील जयसिंगपूर येथे नुकतेच शनिवार दिनांक ०८ फेब्रुवारी ते रविवार ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय, यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
एक साहित्यिक म्हणून आणि शेती विषयावर आधारित माझ्या " गुजरी " या कथेला परीक्षकांनी प्रथम क्रमांक दिला, तो स्वीकारण्यासाठी या साहित्य संमेलनात मी जातीने उपस्थित राहिलो, हे माझे सौभाग्य आहे, असेच मला वाटले. सुटी अभावी उद्घाटन सोहळा मला अनुभवता आला नाही तरी शनिवारचे कवी संमेलन, "शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी?" हा परिसंवाद ऐकता आला. खरे तर आयोजनात कुठलीही कसर आदरणीय मुटे सरांनी आणि आयोजकांनी ठेवली नव्हती.
बाहेरून आलेल्या साहित्यिकांसाठी केलेली निवासाची सोय, जवळच असलेल्या उदगाव येथिल निसर्गरम्य आणि अगदी शांत अशा जैन मंदिर परिसरात केली होती. माझ्यासह हा परिसर आणि तेथील व्यवस्था सर्वांनाच आवडली, यात कुठलीच शंका नाही. निसर्गरम्य वातावरणात सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. आनंदी आनंद झाला... ओळख झाली... माणसाला अजून काय हवे! जेवणाचे आणि अल्पोहाराचे तर विचारूच नका... प्रत्येकांनी दोन घास जास्तच खाल्ले असेल, असे मला वाटते. जवळपास २४ तासांच्या प्रवासाचा शिण येथले वातावरण पाहून अगदी क्षणात विरून गेला. आयोजकांनी संमेलनासाठी अगदी योग्य स्थळ निवडले, असे या ठिकाणी म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दुसऱ्या दिवशी रविवारी मधुर संगीतात आणि सुमधुर आवाजाने सुरु झालेली शेतकरी भक्ती प्रभात तर आयुष्यात न विसरता येणारी आहे. ज्यांना दृष्टी नाही ते इतका साजरा कार्यक्रम करू शकतात तर आपण धडधाकट लोकांनी उगाच माझ्याकडे हे नाही... ते नाही म्हणून का त्रागा करायचा? एकेक गाणे ऐकतांना माझ्या डोळ्यांतून गळणारा आसवांचा पाऊस कदाचित कुणी बघितलाही असेल. यावेळी आत्मानंद, भावविभोर वगैरे सारे शब्द त्या व्यासपीठावर येऊन बसले होते, असे मी म्हणेन. काय तो कार्यक्रम... काय ती आवाजाची जादू... काय ते संगीत... सारं काही अभूतपूर्व होतं... खरेच... रसिकांनी वन्स मोअरची केलेली मागणी अगदीच रास्त होती... सलाम त्या कलाकारांना...!
त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांचा योग्य सन्मान झाला... समारोप झाला... मुटे सर लिखित, विवेक मुटे आणि आमचे कविमित्र सुनील दादा बावणे यांनी केलेली गर्जना मात्र हृदयात घर करून गेली. त्यानंतर परत परतीच्या वाटेवर असलेल्या पाखरांना सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता आला. एक तृप्तीची ढेकर देऊन पुढल्या प्रवासाला लागलेल्या पाखरांना पुन्हा नव्या सोहळ्याच्या निमंत्रणाची आस आहे... विशेष म्हणजे सहृदयी बाळासाहेब गिरी, कुकडे दादा, कांबळे दादा, लक्ष्मणजी हेंबर्डे सर, साईनाथ दादा, सुरेख बोरकर ताई आदींची भेट झाली, हा अमृतयोगच म्हणावा.
सारे काही अविस्मरणीय होते... एक वेगळाच आनंद... एक वेगळीच धुंदी... धन्यवाद मुटे सर आणि समस्त आयोजक.. परीक्षक महोदय... पुन्हा नक्की भेटू!
लीलाधर दवंडे
कामठी (नागपूर)
८४१२८७७२२०