दिवाबत्ती.....(वऱ्हाडी बोली )
झाली सयसंध्याकाय चला करा दिवाबत्ती
दोनी हातानं धरूनं आना उजिळाचा हत्ती
धुळ्ळा उळोतं गोधन पये खुट्याच्या आशेनं
कलतानी म्हने सूर्य उद्या पायटी भेटीनं
पाह्य कश्या हंबरते उभ्या पानावल्या गाई
कुठी दडून बसली बाबू माह्यी भुलाबाई
मांड! आंबोन, कुटार उंडा चार कारोळीले
नोको खराब वाटाले तीच्या मायच्या जीवाले
लाव! देवाजोळ दिवा सांडू देजो म्हना मस्ती
मरो भेवभाना खोस बिंद्राबनात उदबत्ती
हात जोळून मांग सादू देजोरे पिकपानी
तुह्यावर भिस्त पुरी असू देजो म्हना ध्यानी
वाट पाह्यते मारोती करू नोको आनाकानी
तेलवातीचा नेम चुकू नोको कालच्यावानी
ध्यान देजोरे लेकरा काय म्हनते बावाजी
तुले इचारत होती काल तुह्यावाली आजी
नांदी नोको लागजोरे, बाबू बेमान वाऱ्याच्या
गेल्या पुरात वाहूनकाल म्हशी भरोश्याच्या
काढ पाटीदप्तर तुले पुस्तकं जगोतीनं
आंगातला हुनेर उजागरीनं वागोतीनं
आला दायीले गदका थांब देतो बगारनी
लावू नोको बाबू डोये असा पळून उतानी
जाय! बलावून आन जेवाले तुह्या बाबाले
'जाआच हाये ना म्हना वावरात जागलीले'
आंगोनिनं झाकजोरे वरतून डालपाटी
गलतीनं जाजो नोको जनावराच्या तू वाटी
बलावते रातमाय द्या रे तानूनं कुसीतं
मस्त करा गायीगायी उठा सकायी खुशीतं
रवींद्र अंबादास दळवी .
२०२ श्रीवल्लभ अपार्टमेंट
विधाते नगर, नाशिक-४२२००६
7038669542

प्रतिसाद (1)
अस्सल वऱ्हाडी मातीचा सुगंध आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ठेवा
डॉ. मीरा पंडित
रवींद्र अंबादास दळवी यांची ‘दिवाबत्ती’ ही कविता म्हणजे अस्सल वऱ्हाडी मातीचा सुगंध आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ठेवा आहे. संध्याकाळच्या मंगलमय प्रहरी एका आईच्या मुखातून उमटलेले हे बोल म्हणजे ममत्व, भूतदया आणि संस्कार यांची सुंदर गुंफण आहे. ‘उजिळाचा हत्ती’, ‘सयसंध्याकाय’ आणि ‘रातमाय’ यांसारख्या गोड वऱ्हाडी प्रतिमांमुळे या रचनेला एक अद्भुत लय आणि जिवंतपणा लाभला आहे. गोठ्यातील मुक्या जनावरांपासून ते शेतात राबणाऱ्या बापापर्यंत सर्वांची काळजी वाहणाऱ्या भारतीय स्त्रीचे वात्सल्य यात अतिशय हळुवारपणे उतरले आहे. देवभक्तीसोबतच शिक्षणाचे महत्त्व सांगणारी ही कविता वाचकांच्या मनाला थेट भिडते आणि आपल्या गावाकडच्या आठवणींना उजाळा देते.