राबू राबू शेतामधी बळीराजा झिजला
सांग सांग मेघराजा तू कुणावर रुसला,
संसार त्याचा तुझ्या हाती रं आहे सारा
बावरलं मन एकाजागी ना त्याचा थारा,
दुष्काळाचा काटा ह्यो मनामधी रुतला
सांग सांग मेघराजा तू कुणावर रुसला,
रात दिसाच हे त्याला बघवेना हाल
आता का तू होईना बळीराजाची रं ढाल,
भेगाळली भुई पाहून कंठ ह्यो दाटला
सांग सांग मेघराजा तू कुणावर रुसला,
हिरवळीचं धन त्याच डोळ्यापुढून जाईना
दुःखाचं अश्रु त्याच्या डोळ्यामधी माईना,
नभाकडं पाहुनी तो हाका मारतो रं तुला
सांग सांग मेघराजा तू कुणावर रुसला,
त्याच्या धन नाही पदरी नि धन नाही उदरी
जगायचं कसं आता प्रश्न तुला रं विचारी,
सारं तुला कळूनिया असा का रं डाव टाकला
सांग सांग मेघराजा तू कुणावर रुसला.
