माझ्या धन्यासाठी...
पडू दे पाऊस, भिजू दे या शिंगाला,
बळीराजा संकटात तरी साजरा करी या सणाला
दुःख त्याचे सांगतो माझ्या या कानाशी,
रडतो तो फक्त त्याच्याच मनाशी.
गहिवर दाटतो, हुंदके देतो स्वतःशीच,
एकटाच बसून भुईवर नाळ जुळवतो हिशोबाची
व्यथा या जीवाची न सांगतो तो कुणाला.
पडू दे पाऊस, भिजू दे या शिंगाला,
बळीराजा संकटात तरी साजरा करी या सणाला.
नाही पिकाचा भरवसा, यातनाही कमी नाहीत,
डोंगर उरावर असतानाही सेवा करतो आमची.
कसं पाहू रे डोळ्यांनी होरपळलेलं हे रान?
पीडा त्याची पाहून आसवे वाहतात डोळ्यांतून.
नको नको रे देवा, देऊ यातना माझ्या धन्याला.
पडू दे पाऊस, भिजू दे या शिंगाला,
बळीराजा संकटात तरी साजरा करी या सणाला.
येऊ दे या राजाला दिवस सोन्याचे,
दूर होऊ दे संकट त्याच्या दारिद्र्याचे.
मिळू दे सुख आभाळभर सदा त्याला,
देवा, आता तरी पाऊस पडू दे त्याच्या रानाला.
साद घालतो रे तुला, ऐकणाऱ्या विठ्ठला!
पडू दे पाऊस, भिजू दे या शिंगाला,
बळीराजा संकटात तरी साजरा करी या सणाला.
कवी : अनिलकुमार दत्तात्रय सानप
