लेखनस्पर्धा, संमेलन आणि वेबसाईट
सर्व सहकारी सभ्य-सज्जनांना
सप्रेम नमस्कार
१६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन अगदी जवळ आले आहे परंतु अजूनही काही बाबतीत आपली पूर्वतयारी बरीच बाकी आहे. आपल्या सर्व कार्याचा मूळ पाया आपली वेबसाईट आहे. परंतु वेबसाईटच्या अपग्रेडेशन अभावी लेखनस्पर्धा आणि संमेलनाची प्रतिनिधी नोंदणी अशी दोन्ही कामे खोळंबली होती. संकेतस्थळाचे अपग्रेडेशन रखडल्याने मागीलवर्षी लेखनस्पर्धा आयोजित करता आली नव्हती.
बळीराजा डॉट कॉम संकेतस्थळ ड्रुपल (Drupal) या ओपन-सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीमवर काम करत असते परंतु सध्या वापरात असलेले ड्रुपल 7 हे व्हर्जन कालबाह्य होऊन जानेवारी 2025 पासून सपोर्ट बंद झालेला आहे. त्यामुळे संकेतस्थळ ड्रुपल 7 वरून ड्रुपल 11 वर अपग्रेड करणे अत्यंत आवश्यक होते.
बळीराजा डॉट कॉम वर लेख/कविता आणि अन्य रचनांची संख्या २६५० आणि प्रतिसादांची संख्या ४७२५ आहे. एवढ्या मजकुराचा आवाका लक्षात घेता ड्रुपल 7 वरून ड्रुपल 11 वर अपग्रेड करायला दररोज काम केल्यास कमीत कमी दोन महिने एवढा दीर्घ कालावधी लागणार आणि बाहेरून काम करून घ्यायचे ठरवले तर लाखापेक्षा पेक्षा जास्त खर्च येण्याची शक्यता असल्याने व तशी आपल्याकडे काहीही आर्थिक तरतूद नसल्याने तोही पर्याय वापरता येत नव्हता. परंतु या आठवड्यात रात्रंदिवस एक करून (अक्षरशः दररोज कमीतकमी सलग नॉनस्टॉप १६-१७ तास आणि त्यातही दोन वेळा सलग नॉनस्टॉप ३४ तास) लॅपटॉपसमोर बसून १२ दिवसात एकदाचा सोक्षमोक्ष लावून Drupal 7 वरून Drupal 11 Upgradetion उरकून टाकले आहे. आता काही किरकोळ तृटी बाकी आहेत त्या सवड मिळेल तशा पूर्ण करता येतील.
आता तातडीने खोळंबलेले कार्य पूर्ण करायचे असल्याने पुढील २ दिवसात विश्वस्तरीय लेखनस्पर्धा आणि १६ व्या संमेलनाची प्रतिनिधी नोंदणी सुरु करायची आहे. तोपर्यंत सर्वांना विनंती आहे की,
१. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा नियोजनासाठी सहकाऱ्यांची आवश्यकता आहे. ज्यांना या कामात सहकार्य करून आयोजन मंडळात भाग घ्यायचा आहे त्यांनी व्हाटसपवर किंवा खालील प्रतिसादात कळवावे.
२. संकेतस्थळाच्या अपग्रेडेशन नंतर काही लेखन गहाळ झाल्याची किंवा सदोष झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्वांनी आपापले लेखन तपासून काही तृटी आढळल्यास प्रतिसादातूनच कळवावे. वेळ निघून गेली कि त्रुटी निस्तरता येणार नाहीत.
३. प्रतिनिधी नोंदणी आणि लेखनस्पर्धेसाठी बळीराजा डॉट कॉमवर लॉगिन करायची गरज भासते. त्यासाठी सर्वांनी आताच लॉगिन करून ट्रायल घ्यावी.
४. सर्वांनी बळीराजा डॉट कॉमचे सर्फिंग करून दिसलेल्या तृटी कळवाव्यात, जेणेकरून त्या सुधारणे सोयीचे होईल.
आपले सहकार्य होतेच, आहेच पण आता जरा आणखी भरीव सहकार्याची अपेक्षा आहे!
आपला स्नेहांकित,
गंगाधर मुटे
-----------------
