नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

चुकलो रे धन्या ....

ARCHANA's picture
लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
कथा

शिर्षक : चुकलो रे धन्या ...

अलीकडे लोकांच्या मनात शहरांचं आकर्षण फेर धरू लागलंय. जो तो उठतो, शहराकडे पळतो. पण तरीही आजसुद्धा खेडी आपले देखणे रूप घेऊन उभी आहेत. कुठे डोंगराच्या पायथ्याशी, कुठे नदीच्या काठावर, कुठे उंच टेकडीवर, तर कुठे मोकळ्या माळावर खेड्यांनी आपली चित्रे रेखाटली आहेत.
डोंगराच्या पायथ्याशी असलेलं असंच एक खेडं, हिरव्यागार शिवारानं नटलेलं. त्या गावात सगळे शेतकरी आपला व्यवसाय सांभाळत, गुण्या गोविंदान राहत होते. त्यामध्ये रामूदादाचं एक घर, शेतकरी कुटुंब, आपल्या बैलजोडीच्या जीवावर शिवार फुलवत होतं.
रामूदादाला बैलांचा फार नाद. लहानपणापासून बैलांच्या सहवासात त्यांनी दिवस घालवले होते. आज दादाचे वय साठीच्या घरात असेल. पण त्यांनी शेती करणे, बैलांना सांभाळणे सोडलेले नव्हते. सोन्या आणि पाखऱ्या हि त्यांची जिवाभावाची बैलजोडी होती. यापूर्वी अनेक बैलजोड्या होऊन गेल्या, पण असा जीव कोणावरही बसला नव्हता. हि बैलं त्यांच्या घरच्या गौरी नावाच्या गाईच्या पोटची खोंडं होती. आज मोठी होऊन ती दादांना शेती कसायला मदत करत होती.
घरची परिस्थिती तशी फार चांगली. शेती भरपूर होती, म्हणून त्यांच्या थोरल्या मुलाने ट्रॅक्टर घेतला होता. आणि दादाना त्यांच्या वयाच्या मानाने कष्ट करणे शक्य नसल्याने बैलं विकायची घाई घरच्यांनी लावली होती. पण हि बैलजोडी म्हणजे दादाचा जीव कि प्राण असल्यामुळे ते बैलं विकण्यासाठी तयार होत नव्हते. बैलं पण तशी गरीब होती. कधी कुणावर धावली नाहीत कि शिंगं हलवली नाहीत.
दादा म्हणायचे, "हि बैलजोडी म्हणजे माझं हिरं हायती. त्यांच्याशिवाय मी न्हाय, अन माझ्याशिवाय ते न्हायत. त्यांना विकलं तर मी जगायचा न्हाय".
असं बोलून दादा बैलाकडं बघत बसायचे. बैलं पण फार गुणाची. दादाशिवाय वैरण पण खायची न्हायत. दादा दिसले कि डीरकायची. अशी हि दादाची बैलजोडी सगळ्या गावात प्रसिद्ध होती. एखादे लहान मूल जवळ गेले तरी बैलं शांत असायची. घरच्यांना पण बैलांचं खूप कौतुक वाटायचं. सगळेजण बैलांना प्रेमाने सांभाळत होते. दादा आजही शेतीची जमेल तेवढी मशागत बैलाने करत होते. एक दिवस अचानकच पाखऱ्या आजारी पडला, तर दादांना चार दिवस अन्न गोड लागलं नाही. एवढा दादांचा बैलांवर जीव होता.
दादा म्हणायचे, "या जित्रापाच्या जीवावरच मी जगतुया, मग यास्नी विसरून कसं चालल ? यांच्या सेवेतच एक दिवस जगाला राम राम करायचा."
तोपर्यंत त्यांची कारभारीण सखू मावशी म्हणायची, "या बैलांनी तर तुमास्नी येडं केलंया. जरा स्वतःकडं बघा, कशी हाडाची काडं झाल्याती ते."
दादा म्हणायचे, "असू दे गं. म्हातारपणात जगायला काहीतरी कारण असावं माणसाला. न्हायतर रोज मरण जवळ असल्यासारखं वाटतं."
असा संवाद बऱ्याचदा चालायचा.
आज दादा रोजच्यासारखेच लवकर उठले. बैलांचे शेण घाण काढले. शेतात नांगरणीसाठी जायचे म्हणून चहा घेऊन रानात निघाले.
सखू मावशी म्हणाली, "आवो आज राहूदे जायचे रानात. थोरल्या तानाजीला सांगून ट्रॅक्टर घाला रानात अन व्हा मोकळं."
दादांनी तरी पण न ऐकल्यागत केलं, अन नांगर गाडीत घालून बैलं गाडीला जुंपली. जू त्यांच्या खांद्यावर लादलं. कासरा जोराने ओढला. आणि सोन्या हय... पाखऱ्या हय… म्हणत निघून गेलं.
सखूमावशीला आज कायतरी हुरहूर वाटत होती. टिटवी ओरडत निघून गेली. सखूमावशी सुनास्नी म्हणाली, "अगं, आज सोन्या बिथरल्यागतच वाटत हुता. म्हाताऱ्याला ऐकतुया का नाय कुणास ठाऊक?" आणि कामाला लागल्या.
दादानं रानात गेल्यावर बैलं सोडली. सोन्या काय केल्यानं ऐकेना. दादांना वेगळच वाटू लागलं. काय झालं होतं, काय माहित ? सोन्या बिथरला होता. दादा घाबरले. त्यांनी सोन्याला गोड बोलून बघितलं, शिव्या देऊन बघितलं, रागावून बघितलं. पण सोन्या ऐकत नव्हता . सतत ठीस-ठीस करत होता. गोगलगायसारखा गरीब बैल, आज याला काय झाले होते कोण जाणे. दादांनी शिवारभर बघितलं. आसपास कोणच नव्हतं.
दादा म्हणाले, "का रं सोन्या, असा का करतुयास ? शांत हू बाबा."
दादांनी कासरा धरला. सोन्या ऐकत नव्हता, म्हणून त्याला जोराचा हिसका दिला. सोन्या आणखीच बिथरला. दादाच्या अंगावर धावून आला. त्याच्या डोळ्यात राग भरलेला होता. जोराची ठीसकारी मारून सोन्यानं दादाला जोराची धडक मारली. शिंग दादाचा देह भेदून आरपार गेलं. बैलानं दादाला लांब फेकून दिलं. दादा जोरात ओरडले आणि त्यांचा आवाज बंद झाला. सोन्या अजुनपण ठीसकतच होता. दादा गतप्राण झाले होते. आवाज ऐकून लोक गोळा झाले, हळहळू लागले.
बैल आता शांत उभा होता. दादाचा लाडका सोन्या जणू गुन्हा केलेल्या कैद्यासारखा दिसत होता. जिवाभावाच्या मानसानं दगा द्यावा, अन सगळं आयुष्य विस्कटून टाकावं, तसंच क्रूरपणे सोन्या वागला होता. लोकांनी दादाला दवाखान्यात नेलं. त्यांचा देह गतप्राण झाला होता.
इकडं लोकांनी बैलाला चाबकानं फोडून काढले. पण त्याचा आता काही उपयोग नव्हता. सोन्या एखाद्या पश्चाताप झालेल्या माणसासारखा निपचित उभा होता. त्याचे डोळे त्याचा पश्चाताप दाखवीत होते. सोन्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. सोन्याला त्यादिवशी काय झालं होतं, कोण जाणे. सोन्या दानव अंगात शिरल्यासारखा वागला. ज्या मालकानं त्याला आपल्या मुलासारखं जपलं, त्याचाच तो वैरी झाला. त्याचे उपकार, त्याची माया तो विसरला. असं का झालं होतं, हे न उलगडणारं कोडं होतं. जो तो आपआपल्या परीने अर्थ लावत होता. पण कारण काही कळत नव्हतं. दादाला मारायला नियतीनं त्याच्याच जिवाभावाच्या सोन्याला माध्यम बनवून मोठा क्रूर खेळ खेळला होता. सगळेजण हळहळत होते. दादाच्या घरच्यांना बैलाविषयी प्रचंड संताप आला होता. त्या रागात त्याला रानातच आहे त्या ठिकाणी ठेवले होते.
इकडे सोन्या मात्र पश्चाताप झालेल्या माणसासारखा निःस्तब्ध उभा होता. दोन दिवस झाले, सोन्यानं वैरणीला का गवताला शिवलं नाही. त्यानं अन्न-पाणी वर्ज्य केलं होतं. तो कदाचित आपल्या मालकाची वाट बघत असावा. आपला धनी आता येईल, अन आपल्याला भरविल. अशी आशा त्याला वाटत असावी का, कोण जाणे ? आपण कोणत्या वेडात काय केले, याची त्याला जाणीव तरी होती का, कोण जाणे ? पण हा मुका जीव पुरा खचला होता.
आज तिसरा दिवस उजाडला. सोन्या उभ्या-उभ्याच खाली कोसळला, ते कायमचाच. कधीच न उठण्यासाठी. दादाचा पिंड आणि सोन्याचा पिंड बरोबरच वैकुंठाला गेले. आश्चर्याची पण ह्रदय हेलवणारी हि गोष्ट होती. सोन्याने झुरुन झुरुन, 'चुकलो रे धन्या ' या पश्चातापात मालकाच्या आठवणीतच प्राण सोडला होता हे मात्र खरे !

सौ. अर्चना सुनिल लाड
पलूस, जिल्हा - सांगली
७४४७५६०५७८

Share

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  रवी, 02/10/2016 - 22:34. वाजता प्रकाशित केले.

  प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
  अभिनंदन....! CongratsCongrats

  शेतकरी तितुका एक एक!


 • Raj Pathan's picture
  Raj Pathan
  सोम, 03/10/2016 - 18:12. वाजता प्रकाशित केले.

  पाणी तरळले
  अलबत बोटांवर झेलून फेकतोय
  हे असे कांही अनुभव मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत
  म्हणूनच कधी कधी मी माणूस असल्याचा पश्चाताप होतो
  अभिनंदन तथा शुभेच्छा!!

  धन्यवाद