नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

एक होती मावशी

गंगाधर मुटे's picture

एक होती मावशी

एक होती आई, एक होती मावशी
दोघीही सख्ख्याच
पण मावशी पडली शेतकर्‍याच्या घरात
अन् आई पडली नोकरदाराच्या घरात

एकदा काय झालं.........
मावशी डोंगर चढली अन् पाय घसरून पडली
पडली तर पडली पण कमरेतून मोडली
वयाच्या साठीमधी कसं नशीब फ़ुटलं?
कमरेचं हाड चार जागी तुटलं!

दवाखान्यासाठी घरामधला पैसा नाही पुरला
केथ्या-मेथ्या झाडपत्तीविना इलाज नाही उरला

निदान काही कळले नाही
सांधे काही मिळले नाही
हाडं काही जुळले नाही

कधी रांगली, कधी घुसली
माझ्या मावश्यावर मात्र
कधीच नाही रुसली

शेवटी काय झालं? व्हायचं तेच झालं!
ते यम नावाचं कार्ट वाजा घेऊन आलं!!
राम-नाम सत है, सत बोलो गत है!

यंदा काय झालं.........
आई जिना चढली अन् पाय घसरून पडली
पडली तर पडली पण कमरेतून मोडली
वयाच्या अंशीमधी कसं नशीब फ़ुटलं?
कमरेचं हाड चक्क चार जागी तुटलं!

एका तासाच्या आत दवाखाना गाठला
पैशाचा पुठ्ठल पाण्यावाणी वाटला
दवाई-सलाईन-गोळ्या-प्लेट्स
खर्च नाही जाणला!
ऑपरेशनसाठी डॉक्टर
राजधानीहून आणला!!

मावशीवाणी आता आई
रांगत नाही, घुसत नाही
केवीलवाणी बसत नाही
खणखण बोलते...!
टणटण चालते...!!

हे मावशे,
मेल्यावर तरी आता ‘अभय’ पणे वाग
विधात्याले खंबीरपणे ठणकाऊन सांग
तू आता देवावरबी भरोसा नकोस ठेऊ
शेतकर्‍याच्या घरी पुन्हा जन्मास नको येऊ...!!

- गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Share

प्रतिक्रिया