नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

वाटचालीची दिशा व कंपूबाजीचा धोका - भाग - ३

गंगाधर मुटे's picture

शेतकरी साहित्य चळवळ : दिशा व कार्यपद्धती - भाग - ३

वाटचालीची दिशा व कंपूबाजीचा धोका
 
     प्रारंभीच नमूद करणे आवश्यक आहे कि, अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीला कुणीही गॉडफादर नाही, कुणीही प्रायोजक नाही, ही कुणा एका व्यक्तीची खाजगी मालमत्ता नाही आणि सरकारी अनुदानावर किंवा बड्या धेंडाकडून भरमसाठ देणगी मिळवून त्यांच्या ताटाखालचे मांजरही होणारी नाही. लोकवर्गणी आणि आत्महत्येच्या पायरीवर उभा असलेल्या आणि आर्थिकस्थितीने पुरेपूर खंगलेल्या शेतकऱ्यांकडून निधी गोळा करत चालणारी शेतकरीपुत्र सारस्वतांनी शेतकरीपुत्र सारस्वतांसाठी चालविलेली ही लोकचळवळ आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातूनच ही साहित्य चळवळ आपण पुढे नेत आहोत. 
 
       शिवाय प्रतिनिधी नोंदणीच्या माध्यमातून सुद्धा फार मोठा निधी उभा केला जाऊ शकत नाही. असा मागील चारही साहित्य संमेलनाचा अनुभव आहे. प्रतिनिधी नोंदणीच्या माध्यमातून एकूण खर्चाच्या तुलनेने पहिल्या संमेलनात १.५ टक्का, दुसऱ्या संमेलनात २ टक्के, तिसऱ्या संमेलनात २ टक्के तर मुंबईच्या ४ थ्या संमेलनात ५ टक्के निधी गोळा झाला. शेतकरी दानशूर असतो म्हणून ही साहित्य चळवळ पुढे जात आहे मात्र शेतकरीपुत्र सारस्वत, दानशूर शेतकऱ्याचा पूत्र असला तरी व्यवसाय बदल झाल्याने त्याच्यामधला दातृत्वाचा गूण लोप पावलेला असतो. म्हणून प्रतिभावंत सरस्वतांकडून भरीव आर्थिक सहकार्य मिळेल अशी अपेक्षा शेतकरी साहित्य चळवळीने कधीच बाळगलेली नाही.  
 
         परंतु उलट स्थिती अशी आहे कि, आम्ही सारस्वत आहोत, आम्हाला सन्मानाने निमंत्रित करा, आम्हाला पालखी पाठवा, जाण्यायेण्याचा खर्च द्या, मानधन द्या. अशी अनेक (किंवा बहुतांशी) साहित्यिकांची अपेक्षा असते. स्वेच्छेने संमेलनास येणे म्हणजे अनेकांना प्रचंड अपमानास्पद वाटते. प्रतिनिधी नोंदणी करणे म्हणजे भिकाऱ्यासारखे हातात कटोरे घेऊन उभे राहिल्याचा अनेकांना आभास होतो. स्वतःला अतिप्रतिभाशाली समजणाऱ्या प्रतिभावंतांना तर चक्क त्यांच्या प्रतिष्ठेवर अरिष्ट आल्यासारखे वाटते. अर्थात  अशी भावना काही साहित्यिकांची असेल तर ते गैर आहे असेही आम्ही मानत नाही. पण आपण सन्मान कुणाला मागतो आहोत, याचे भान किंवा इतके छोटेसे व्यावहारिक ज्ञान सारस्वतांना का असू नये? शेतकरी चळवळ म्हणजे साहित्यिकांच्या पालखीचा भोई नव्हे की त्यांनी या साहित्य चळवळीकडून पालखीची अपेक्षा धरावी. उलट या साहित्य चळवळीकडे साहित्यिकांनी आपली आई म्हणून बघितले पाहिजे आणि साहित्यिकांनी या साहित्य चळवळीच्या पालखीचा भोई होण्यात धन्यता मानली पाहिजे. 
 
कंपूबाजीचा धोका : 

         केवळ मनुष्यच नव्हे तर संबंध सजीवसृष्टी समूहप्रिय आहे. समूहप्रियता नैसर्गिक असली तरी जेव्हा तिचा अनैसर्गिकपणे अतिरेकी वापर व्हायला सुरुवात होते तेव्हा समूहप्रियतेची जागा कंपूबाजी नावाचा महारोग घेत असतो. दुर्दैवाने या रोगाची लागण सर्वत्रच झालेली दिसत असली तरी साहित्यक्षेत्रात या रोगाने अत्यंत उग्र आणि बीभत्स किळसवाणे रूप धारण केलेले आहे. निदान अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ तरी या संसर्गजन्य रोगापासून दूर ठेवण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ म्हणजे एक प्रवाह असला पाहिजे ज्या प्रवाहात ज्याची इच्छा असेल त्याला सामील होता आले पाहिजे आणि ज्याची इच्छा नसेल त्याला प्रवाहापासून दूर सुद्धा जाता आले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.
            त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपल्या सोयीने अथवा आवडीने अथवा इच्छेने कवीसंमेलनासाठी कवी किंवा गझल मुशायऱ्यासाठी गझलकार निवडण्याचे आम्ही कटाक्षाने टाळत आलेलो आहोत. यानंतरही टाळले जाणार आहे आणि प्रवाहात स्वेच्छेने सामील होणारांसाठीचे मार्ग सदैव खुले ठेवले जाणार आहेत.
 
कवी आणि गझलकार निवड प्रक्रिया :
 
       कवीसंमेलनासाठी कवी आणि गझल मुशायऱ्यासाठी गझलकार निवडण्याची प्रक्रिया दरवर्षीपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. दिनांक २० डिसेंबर २०१८ पर्यंत जे 'संमेलन सहभाग प्रतिनिधी' म्हणून नोंदणी करतील त्यामधूनच कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना रीतसर निमंत्रित केले जातील. त्यामुळे यावर्षी निमंत्रितांचे कवीसंमेलन व निमंत्रितांचा गझलमुशायरा असणार आहे.
 
१) ५ वे साहित्य संमेलन, पैठण - प्रतिनिधी नोंदणी पद्धत : या विषयी सविस्तर माहिती  http://www.baliraja.com/rep-2019 येथे उपलब्ध आहे. 
२) शेतकरी साहित्य चळवळ : दिशा व कार्यपद्धती - भाग - १ >>>  http://www.baliraja.com/node/1728 येथे वाचा.
३) शेतकरी साहित्य चळवळ : शेती साहित्य संसद - भाग - २ >>>  http://www.baliraja.com/node/1732 येथे वाचा.
 
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
Share

प्रतिक्रिया