नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

विद्याथ्यांना पत्र

Anil Ghanwat's picture

प्रिय विद्यार्थी मित्रा,
अनेकांना उपलब्ध न होणारी शिक्षण घेण्याची संधी तुला मिळाली आहे त्याबद्दल तुझे अभिनंदन.मोठे स्वप्न उराशी बाळगून तुझ्या बापाने आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचारही न करता तुला महाविद्यालयीन शिक्षणाची सोय करून दिली आहे.काट्याकुट्यात,उन्हापावसात, चीखलामातीत जनावरासारखे राबणारा तुझा बाप,तू शिकावे,चांगली नोकरी मिळवावी आणि तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस यावे यासाठी स्वतः झिजतो आहे आणि तुझ्या सुखी आयुष्याचे स्वप्न पाहतो आहे.तुही तुझ्या परीने चांगले शिकावे, चांगली नोकरी मिळवावी यासाठी तुझ्या जीवाचा आटापिटा करीतच असणार.
तुला नाउमेद करण्यासाठी मी हे लिहित नाही पण दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आहे की,चांगले अभियांत्रिकी सारखे कौशल्याचे शिक्षण घेणारे मुलेही रोजगाराच्या शोधात वणवण भटकताना दिसतात,मग सर्वसाधारण शिक्षण घेणाऱ्या मुलांचे भवितव्य काय असणार ? साध्या शिपायाच्या नोकरीसाठी अभियांत्रिकी शिकलेली मुले प्रयत्न करताना दिसतात,ऑटोरिक्षा चालवताना दिसतात या परिस्थितीवरून, शिक्षित मुलांना नोकरी मिळण्यासाठी नाउमेद करणारे वातावरण आहे हे वास्तव तू समजून घे. वयाची पंचेवीस तीस वर्षे चांगले शिक्षण घेवूनही अपेक्षित रोजगार मिळत नाही आणि एवढे शिक्षण घेवून पुन्हा परत जावून तोट्यातील शेती व्यवसाय करवत नाही ही तुझी अडचण झाली आहे.शिकवून चांगली नोकरी मिळवेल आणि आपले पांग फेडेल या स्वप्नात वावरणारा बाप, त्याने पाहिलेली स्वप्न आणि शिकूनही अपेक्षित रोजगार मिळत नाही हे तुझ्या समोरील वास्तव,अश्या जीवघेण्या कात्रीत सापडलेल्या तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकतो.
मित्रा दोष तुझ्या बापाचा नाही ना तुही कुठे कमी पडलास.शेतीला लुटून कारखानदारी उभी करण्यासाठी,कल्याणकारी सरकार चालवण्यासाठी. सरकारने आर्थिक धोरणांचा जो धुमाकूळ घातला आहे,दोष त्या व्यवस्थेत आहे हे नीट समजून घे. देश स्वतंत्र झाला आणि कारखानदारीचा विकास करण्याच्या नावाखाली, शेतीमधील उत्पादन वाढवले पाहिजे आणि ते कमीतकमी किमतीत उपलब्ध झाले पाहिजे यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले गेले. कच्चा माल स्वस्तात स्वस्त घेणे आणि पक्का माल महागात महाग विकणे हे गोऱ्या इंग्रजाचे धोरण या काळ्या इंग्रजानेही तसेच चालू ठेवले. ते धोरण राबवता यावे यासाठी शेतकऱ्यांचे शेतीवरील नियंत्रण सरकारने स्वतःकडे घेतले आहे. घटनात्मक दुरुस्त्या करून,शेतकरी विरोधी कायदे करून सरकारने शेती सतत तोट्यात ठेवली,शेतकऱ्याला गुलाम केले.बाजारपेठेत वेळोवेळी हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव खालच्या पातळीवर राहतील यासाठी सरकार सातत्त्याने प्रयत्न करत आहे. त्याचा परिणाम असा झाला की शेतीवर काम करणारा शेतकरी आणि शेतमजूर हे समाज गरीब राहिले,गावातील गरिबी आणि कर्जबाजारीपणा वाढत गेला, आज ग्रामीण भागातील पन्नास टक्के लोकसंख्या क्रयशक्ती गमावून बसली आहे,गरज असूनही ग्राहक म्हणून बाजारपेठेत येवू शकत नाही. त्यामुळे कारखानदारीमधील उत्पादनालाही मर्यादा आल्या आहेत,पर्यायाने कारखानदारीमध्ये अपेक्षित रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकत नाहीत. तिकडे अत्यल्प संधी असलेल्या सरकारी नोकऱ्यांच्या मागे आयुष्याचे तीस पस्तीस वर्षे घालवूनही नोकरी मिळत नाही म्हणून मनस्ताप झालेली तरुण पिढी पाहिली म्हणजे काळीज तुटायला लागते.सरकारी नोकरीतून करोडो तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटू शकत नाही हेही वास्तव ध्यानात घे. शेती किफायतशीर केल्याशिवाय गावातील लोकांकडे पैसा येणार नाही आणि गावातील लोकांकडे पैसा आल्याशिवाय मोठी ग्राहकशक्ती बाजारपेठेत येणार नाही.आणि जोपर्यंत क्रयशक्ती असलेला मोठा ग्राहक वर्ग बाजारपेठा गजबजून टाकणार नाही तोपर्यंत कारखानदारीला भवितव्य नाही आणि कारखानदारी चांगली झाल्याशिवाय तरुणांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकणार नाही हे अर्थशास्त्रीय वास्तव आहे..विषय खूप मोठा आहे,थोडक्यात ही कोंडी सरकार निर्मित आहे हे पूर्णपणे लक्षात घे.
तरुण मित्रा तिकडे पोटाला चिमटा घेवून तुला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा तुझा बाप आर्थिक कोंडी झाल्यामुळे दिवसेंदिवस अत्महत्येकडे जातो आहे.आत्महत्त्या कधी कोणा शेतकऱ्याचे दर ठोठावेल सांगता येत नाही.इकडे तू शिकूनही रोजगारा अभावी हतबल झाला आहेस. या कोंडीतून बाहेर पडण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे शेती व्यवसायाचे फायद्यात येणे आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे, यापेक्षा दुसरा जवळचा मार्ग नाही.शरद जोशी आणि शेतकरी संघटना गेली तीस पस्तीस वर्षे हा आर्थिक विचार सतत मांडत आले आहेत.आज प्रसंग गंभीर झाला आहे.ग्रामीण भारतात पैसा नाही आणि ग्रामीण मुलांना शहरात सामाऊन घेणारी व्यवस्था नाही अशा विपरीत कोंडीत शेतकरी आणि त्यांची तरुण मुले सापडली आहेत.
मित्रा अजूनही वेळ गेलेली नाही तू शिकला आहेस, शिकतो आहेस,लुटारूंचे डावपेच ओळखण्याचे आणि ते उधळून लावण्याचे ज्ञान तुझ्याकडे आले आहे. बापाने सोन्यासारखे धान्य तयार केले तर त्याला मातीमोल भावाने लुटून नेणारी व्यवस्था तयार करणाऱ्या हरामांना तूच जाब विचारू शकतोस, त्यांना वठणीवर अणु शकतोस.तुझा बाप थकला आहे,जर्जर झाला आहे तो कितपत लढा देवू शकेल सांगता येत नाही. पण शेती व्यवसाय फायद्यात आल्याशिवाय तुझ्यासामोरील रोजगाराचीही समस्या सुटणार नाही याचेही भान ठेव.
येणाऱ्या १०,११,१२ डिसेंबर २०१८ रोजी शिर्डी येथे शेतकरी संघटनेचे अधिवेशन भरणार आहे या अधिवेशनाला तू तुझ्या मित्रासह ये आणि तुझ्या बापाचा बाजारपेठेत पराभव कोणी आणि कसा केला हे शिकून घे, अभ्यास कर,या अभ्यासातूनच तुला तुझ्या भवितव्याचाही मार्ग सापडेल.
तुझाच,
अनिल घनवट
अध्यक्ष शेतकरी संघटना.

Share