नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

इजरायल कृषी अभ्यास दौरा : अंतरिम निष्कर्ष : भाग १

गंगाधर मुटे's picture

इजरायल कृषी अभ्यास दौरा : अंतरिम निष्कर्ष : भाग १

              इजरायलचा विषय निघाला की बहुतांशी इजरायलच्या प्रगत शेतीतंत्राचा विषयही आपसूकच निघतो. इजरायलची शेती अत्यंत प्रगत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीक्षेत्रात तेथील शेतकऱ्यांनी उंच भरारी घेतली आहे आणि  तिथला शेतकरी स्वबळावर स्वयंपूर्ण झाला आहे, असा गोड समज/गैरसमज भारतीयांनी करून घेतला आहे. इज्राएलची शेती आणि इजरायलाचा शेतकरी भारतीय शेती आणि भारतीय शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय आहे, असाही आणखी एक गोड समज/गैरसमज भारतीयांनी करून घेतला आहे. शेती क्षेत्र वगळता अन्य सर्व क्षेत्रात भारत मात्र इजरायलच्या फारच पुढे असून इजरायल पासून काय बोध घ्यायचा, काय धडे गिरवयाचे ते भारतीय शेतकऱ्यांनीच गिरवावे, असे एकंदरीतच भारतीय जनमत असल्याचे अनेक वर्षांपासून मला जाणवत आले होते. पण पूर्वग्रह गोंजारत बसलो तर नवे शिकता येत नसते. नवीन काही शिकायचे असेल तर आधी काहीतरी लिहिलेली पाटी पुसून कोरी करावी लागते व नवे ज्ञान ग्रहण करण्यासाठी रिकाम्या हाताची ओंजळ करून पुढे जावे लागत असते. म्हणूनच दौऱ्यावर जाण्यापूर्वी मी "इस्त्राईल अभ्यास दौरा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. डोके रिकामे आणि मेंदू रिफ्रेश करून जातोय. बघुयात काय शिकायला मिळते ते!" असे मनाशी पक्के ठरवले होते आणि तसा सूचक उल्लेख देखील १४ फेब्रुवारीच्या पोस्टमध्ये केला होता.
 
 Israel             ठरल्याप्रमाणे २२ ते २८ फेब्रुवारी २०१९ इस्त्राईल अभ्यास दौरा संपन्न झाला. इजरायल मधील छोट्याशा वास्तव्यात जे काही ऐकायला, वाचायला आणि बघायला मिळाले त्याची आपल्या पूर्वानुभवांशी व सद्यस्थितीशी सांगड घालून भारत आणि इजरायल यांची तुलना केली कि अनेक पैलूवर प्रकाश पडून काही निष्कर्षांप्रत पोचता येऊ शकेल. उण्यापुऱ्या आठ दिवसात समग्र इजरायलचा अभ्यास होणे शक्य नाही याची मला जाणीव आहे. हत्तीचा एक अवयव बघून त्यालाच हत्ती समजण्याचा आततायीपणा सुद्धा उपयोगाचा नाही. शितावरून भाताची परीक्षा या समीकरणाला अनुसरून मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थातच प्रारंभीच्या काळात मी जे माझे निष्कर्ष देत आहे ते अंतरिम स्वरूपाचे असून अंतिम टप्प्यात कदाचित निष्कर्षात बदल होऊ शकतो.
 
अवलोकन/निष्कर्ष : १
 
 1. इजरायल हा आकाराने आणि लोकसंख्येने एक अत्यंत छोटासा पण सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत सजग आणि बलशाली देश. स्वबळावर शत्रूचा सामना करण्याची व त्याला चारीमुंड्या चीत करण्याची ऐपत बाळगून आहे. संकट आल्यावर आंतरराष्ट्रीय जनसमुदायाकडे  तोंड वासून बघत राहण्याची त्याला गरज नाही. स्वतःची ध्येय्य-धोरणे राबवताना किंवा प्रत्युत्तरादाखल आक्रमण करताना हा चिमुकला देश जगातल्या कोणत्याही देशाची तमा बाळगत नाही. स्वसंक्षणाच्या बाबतीत कसलीच तडजोड स्वीकारत नाही. 
 2. इजरायल सारखा छोटासा देश स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून स्वबळावर जेरुसलेम शहरात एक खांबाचा देखना अर्धचंद्राकार फ्लाय ओव्हर निर्माण करू शकतो. आम्ही मात्र चीन अथवा अन्य देशातून आयते तंत्रज्ञान आणतो, पैसे मोजून ते काम त्यांच्याकडूनच करून घेतो आणि आमचा देश विकास करत असल्याचा डांगोरा पिटतो. इजरायल हा देश केवळ कृषि क्षेत्रच नव्हे तर सर्वच क्षेत्रात स्वदेशी स्वयंपूर्ण  आहे असे जाणवले. 
 3. मार्केटमध्ये विक्रीला फारशा इंपोर्टेड वस्तू आढळल्या नाहीत. स्थानिक उत्पादित वस्तूच नजरेत पडल्यात. 
 4. सुरक्षेच्या नावाखाली पुलिस चौक्या, बॅरिकेट, स्पीडब्रेकर, चौकाचौकात वाहतूक नियंत्रण कक्ष अथवा पुलिस वगैरे कुठेही आढळले नाही.
 5. इजरायलमध्ये रात्री-बेरात्री महिला निसंकोचपणे कुठेही फिरू शकतात.
 6. रस्ते आणि चौक रुंदीने कमी म्हणजे अगदी तंतोतंत आहेत. जमिनीचा देखील ते वापर काटकसरीने करतात.
 7. वेळेच्या बाबतीत फार काटेकोर आणि शिस्तप्रिय आहेत.
 8. स्वदेशाबद्दल बोलताना अभिमानानाने पण किंचितसे अतिरंजित व बढाईपूर्ण बोलतात. उदा. मी एकाला विचारले कि पोचायला किती वेळ लागेल तर तो म्हणाला कि रस्ता एकदम सुपरफास्ट आणि ३ लेनचा आहे, ५० किमी अंतर आपण ३० मिनिटात पार करू. प्रत्यक्षात मात्र ४५ मिनिटे लागलीत.
 9. इजरायलच्या प्रत्येक नागरिकाला लष्करात सेवा देणे अनिवार्य आहे. पुरुषांना ३ तर महिलांना २ वर्षे सैनिकीशिक्षण घेणे व सेवा देणे सक्तीचे आहे.
तात्पर्य : स्वातंत्र्य मिळण्याच्या बाबतीत एका वर्षाने भारतापेक्षा लहान असूनही इज्राएलने अनेक बाबतीत घेतलेली भरारी अवाक करणारी आहे. शेतीपेक्षाही अन्य विषयात भारताने इजरायलचे अनुकरण करावे, आदर्श घ्यावा, अशी स्थिती नक्कीच आहे.

अधिक सखोल व विस्तारपूर्वक आढावा घेण्यासाठी पुस्तकरुपातच मांडणी करावी लागेल, त्याशिवाय विषयाला न्याय देणे अवघड आहे.

 
- गंगाधर मुटे 
Share

प्रतिक्रिया

 • ravindradalvi's picture
  ravindradalvi
  शुक्र, 15/03/2019 - 13:12. वाजता प्रकाशित केले.

  आम्हीही फार पूर्वीपासून एकत आलेलो आहे इज्राईल यां देशाबाबत !आणि तेथील प्रगत शेतीतंत्रज्ञान आणि नियोजनाबाबत!भारतीय शेतकर्यानी त्यांचे अनुकरन करावे !स्वता स्वावलंबी व्हावे !हे ही सांगण्यात आलेले आहे !परंतू तेथील शेती पीके हवामान आणि भारतीय शेती पिके हवामान ! मुख्य म्हणजे शाशकीय धोरण !या बाबतीत वस्तुनिष्ठपने विवेचन व्हावे ! भारतीय शेतकर्याच्या दृष्टीने कौतूकाचा आणि आदर्शवत असलेला इज्राईल ! आपण पुस्तक रुपान लिहावा असे वाटते

  रवींद्र अंबादास दळवी
  नाशिक